हातात बर्फाचा मोठा तुकडा घेऊन प्रो. राव वर्गात प्रवेश करतात. विद्यार्थ्यांची उत्सुकता ताणलेली असतानाच बर्फाचा तुकडा खाली पडून त्याचे तुकडे होतात. हे पाहून विद्यार्थी गोंधळून जातात, पण त्यातूनच ‘थर्मोडायनॅमिक्स’चा तास सुरू होतो.. नातवंडे त्यांच्याकडे जातात, तेव्हा ते बाहेर जेवायला घेऊन जातात, भन्नाट गोष्टी सांगतात.. त्यांना भारतरत्न जाहीर झाले, पण मी त्यांचा जावई असूनही त्यांच्याशी संपर्क साधू शकलेलो नाही, कारण ते मोबाईल, ईमेल वापरत नाहीत.. संशोधक म्हणून त्यांचा ‘एच-इंडेक्स’ शंभरीच्या पलीकडे, १०६ इतका आहे. याबाबतीत जगातील अव्वल संशोधकांमध्ये त्यांचा समावेश होतो!
प्रो. राव अव्वल दर्जाचे संशोधक आहेतच, त्याचबरोबर अफाट कष्ट घेणारा, दर्जेदार शिक्षक, वेळ अजिबात न दवडणारा माणूस, उत्तम व्यवस्थापन कौशल्ये असणारा प्रशासक, तरुणांना प्रोत्साहन देणारा, देशात विज्ञानाची पायाभरणी करून त्यावर कळसही चढवणारा, स्पष्टवक्ता, अतिशय साधा अन् सर्वामध्ये सहज मिसळणारा.. एखादा निराश असेल तर त्याने प्रो. राव यांच्याशी पाच-दहा मिनिटे बोलावे. बस्स्. नैराश्य कुठल्या कुठे पळून जाईल.
त्यांनी अतिशय तरुण वयात संशोधनप्रबंध लिहायला सुरुवात केली, तीसुद्धा स्वतंत्रपणे कोणत्याही गाइडशिवाय. अफाट इच्छाशक्ती, कष्ट, कुतूहल, कुटुंबाचा-शिक्षकांचा प्रभाव आणि ऊर्मी ही त्याची कारणे. त्यामुळेच ते शून्यातून संशोधक म्हणून वाढले आणि देशातील विज्ञानाचा दर्जाही वाढवला. सुरुवातीला पैसे नसताना मार्ग काढला, त्यातून संशोधन केले. या क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच भारतात आज या क्षेत्रात भरपूर निधी, अनेक नावाजलेल्या संस्था व उच्च तंत्रज्ञान पाहायला मिळते. ते आयुष्यात कधी थांबले नाहीत. मग ते संशोधनाचे क्षेत्र असो, नाहीतर बंगळूर येथील इंडियन इन्टिटय़ूट ऑफ सायन्सेसच्या परिसरात सकाळचे चालणे असेल. वेळेचे व्यवस्थापन इतके पक्के की, एक क्षणही वाया घालवत नाहीत. एकाच वेळी वेगवेगळय़ा गोष्टींचा विचार करणे त्यांना जमते. त्यामुळे टीव्ही पाहत असताना त्यांचा एखाद्या पेपरबाबत किंवा व्याख्यानाबाबत विचार सुरू असतो.
त्यांनी नेहमीच नव्याचा ध्यास घेतला. कानपूर- आयआयटी येथे वयाच्या तिशीच्या आतच त्यांना प्रोफेसर म्हणून बोलावण्यात आले. तिथे त्यांनी त्या काळच्या लोकप्रिय क्षेत्रांमध्ये काम न करता नव्याने ‘सॉलिड स्टेट केमिस्ट्री’ हा विषय वाढवला, त्याचा विभाग उभा केला. इतर लोक त्यांना ‘कशात वेळ घालवतो?’ असे वेडय़ात काढत होते. पण पुढे इतर आयआयटीमध्ये हा विषय वाढवण्यासाठी प्रो. राव यांना खास पाचारण करण्यात आले. आताची नॅनो टेक्नॉलॉजी व इतर अनेक उपयुक्त तंत्रज्ञान हे याचेच फळ आहे. जगातील नावाजलेल्या संस्था व सोसायटीजचे ‘फेलो’ असणारे ते जगातील कदाचित एकमेव शास्त्रज्ञ आहेत.
प्रो. राव म्हणजे उत्तम शिक्षक. आता ऐंशीच्या जवळ पोहोचले तरी ते शाळेच्या मुलांनासुद्धा उत्तम शिकवतात. त्यासाठी इतका जीव ओततात की, तास संपताना घामाघूम होतात. विद्यार्थ्यांना भरपूर ज्ञान मिळतं, त्यांच्यात सळसळता उत्साह उतरतो, नैराश्य कुठच्या कुठं पळून जातं. ते अतिशय साधे आहेत. कामाच्या वेळी काम. घरी आले की घरचे होतात. नातवांना गोष्टी सांगतात, लाडाने जेवायला घेऊन जातात, कुटुंबीयांसोबत दरवर्षी हिमालयात फिरायला जातात. विज्ञानाच्या पलीकडे स्वयंपाक, संगीत, धर्म, कला, राजकारण अशा सर्व विषयात रस घेतात आणि भरभरून बोलतातसुद्धा!
ते स्पष्टवक्ते  आहेत. ते नेहमी सांगतात, ‘सर्वाना मर्यादा असतात, पण पुढे जाण्यासाठी त्या ताणाव्या लागतात.’ ते जीवनात अनेक पायऱ्या चढून पुढे गेले आहेत, पण त्यांचा हा प्रवास भारतरत्न पुरस्कारानंतरही सुरूच राहील, अगदी त्यांच्या ‘लिमिटलेस लॅडर’ या आत्मचरित्रासारखा!
(डॉ. गणेश हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ असून, पुण्यातील ‘आयसर’ संस्थेचे संचालक आहेत. तसेच, प्रो. सीएनआर राव यांचे जावई आहेत.)
                                                                                शब्दांकन- अभिजित घोरपडे

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
how social media influencers affect on our mental health and behavior
‘Hello Guys’ म्हणत इन्फ्ल्युएन्सर्स तुमच्या मनात शिरतात की डोक्यात? मानसोपचारतज्ज्ञांकडून जाणून घ्या कसा होतो परिणाम…
sanjay raut raj thackeray amit shah
“राज ठाकरेंची खंत फक्त मलाच माहिती”, अमित शाहांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टिप्पणी; ‘त्या’ व्हिडीओचा केला उल्लेख