प्राचार्याची ३७० आणि प्राध्यापकांची २ हजार ८८ पदे भरण्यास मान्यता

पुणे : राज्याच्या वित्त विभागाच्या परवानगीने प्राचार्याची ३७० आणि सहायक प्राध्यापकांची २ हजार ८८ पदे भरण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक महाविद्यालयास संबंधित विद्यापीठ किंवा नियामक प्राधिकरणाने दिलेली संलग्नता अबाधित राहण्यासाठी, महाविद्यालयाचे मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन होण्यासाठीची आवश्यक मर्यादा विचारात घेऊनच शिक्षकीय पदांचे वाटप करण्यात आल्याचे सष्ट करण्यात आले आहे.

प्राचार्य आणि सहायक प्राध्यापक भरतीवरील निर्बंध शिथिल करण्यात आल्याचा शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पावणेदोन वर्षांपासून सहायक प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. प्राचार्य संवर्गाच्या पदभरतीमुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसल्याने प्राचार्य पदाच्या ३७० रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आली. तर १ ऑक्टोबर २०१७च्या विद्यार्थी संख्येला आधारभूत मानून सहायक प्राध्यापकांच्या २ हजार ८८ पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अतिरिक्त ठरलेल्या सहायक प्राध्यापकांचे रिक्त पदी समायोजित करून संबंधित विषयासाठी सहायक प्राध्यापकाचे पद अतिरिक्त नसल्याचे विभागीय सहसंचालकांनी प्रमाणित केल्यावरच पदभरतीची जाहिरात देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

संस्थेवर वेतनाची जबाबदारी..  

आकृतिबंध अंतिम झालेला नसल्याने आकृतिबंधास वित्त विभागाची अंतिम मंजुरी मिळेपर्यंत संबंधित पदे अंतिम समजण्यात येऊ नयेत. त्या व्यतिरिक्त पदांवर भरती केल्यास संबंधित उमेदवारांच्या वेतनाची जबाबदारी संस्थेची असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असला, तरी या भरतीनंतरही अनेक पदे रिक्त राहणारच आहेत. कारण उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ऑक्टोबर २०१७च्या कार्यभाराला अंतिम मान्यताच दिलेली नाही. ही मान्यता दिल्यास सर्व रिक्त पदे भरता येतील. सर्व रिक्त पदे भरली जाऊ नयेत म्हणूनच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०१७च्या कार्यभाराला अंतिम मान्यता दिलेली नाही. प्राध्यापकांची भरती करताना शासनाने विद्यार्थ्यांचे हित पाहिलेले नाही. 

डॉ. संदीप पाथ्रीकर, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना