लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नदीपात्र, तलाव, कालवा आदी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास महापालिकेकडून मनाई असल्याने बहुतांश नागरिकांनी महापालिकेच्या विसर्जन हौद किंवा घरातच गणेशमूर्ती विसर्जन केले. थेट नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन होऊ नये, यासाठी महापालिकेकडून बांबूंचे अडथळे नदीपात्रात उभारण्यात आले आहेत. गणेशोत्सवातील पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशीही नैसर्गिक जलस्रोतात मूर्ती विसर्जनाला बंदी असेल, असे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.
गणेश चतुर्थीला विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना केल्यानंतर कुलाचारानुसार दीड दिवसांनी विसर्जन करण्याची प्रथा आहे. शहरात दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी नदी, तलावात विसर्जन करू नये, असे आवाहन महापालिकेकडून केले जाते. यंदाही महापालिकेने तसे आवाहन केले होते. तसेच प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना बंदी असल्याने त्या पाण्यात येऊ नयेत, यासाठी महापालिकेने विशेष दक्षता घेतली होती.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत बदल
विसर्जनासाठी महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४२ विसर्जन हौद, २६५ ठिकाणी ५६८ लोखंडी टाक्या, २५२ गणेशमूर्ती संकलन केंद्र आणि दीडशे फिरते हौद असे नियोजन केले आहे. मात्र फिरते विसर्जन हौद उत्सवाच्या पाचव्या दिवसापासून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दीड दिवसांच्या गणपतींचे घरच्या घरी किंवा नदीपात्रात महापालिकेने उभारलेल्या हौदांमध्ये विसर्जन करण्यात आले.
जलस्रोतामध्ये विसर्जन करण्यास मनाई असल्याने नागरिकांनी घरातच किंवा जवळच्या कृत्रिम हौदात, लोखंडी टाक्यांमध्ये गजाननाचे विसर्जन केले. काही ठिकाणी मूर्तिदानही करण्यात आले. दरम्यान, फिरते विसर्जन हौद आणि निर्माल्य कलश उपलब्ध नसल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये पवार बंधूंमध्ये राजकीय संघर्ष?
नदीपात्रात, कालव्यात, तलावात मूर्ती विसर्जन करण्यात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद आहे. -संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका