लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गणेशोत्सवासाठी विसर्जनाची महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. नदीपात्र, कालवा, तलावात मूर्ती विसर्जनास मनाई करण्यात आली असून क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बांधण्यात आलेले हौद, लोखंडी टाक्या आणि फिरत्या हौदांमध्ये मूर्ती विसर्जन करता येणार आहे. मात्र, विसर्जनाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी फिरते हौद एकाच जागेवर उभे राहिल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. ही बाब लक्षात घेऊन फिरत्या हौदांचे ठिकाण (लोकेशन) पाहण्याची सुविधा महापालिकेकडून देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. तसेच पाचव्या, सातव्या आणि अनंत चतुर्दशी दिवशी गणेश मूर्ती विसर्जनाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे महापालिकेकडून विसर्जन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेने फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, ही सुविधा भाविकांसाठी अडचणीची ठरत आहे.
आणखी वाचा-गणपती विसर्जनासाठी महापालिका सज्ज; विसर्जन घाटांवर विविध सुविधा
यंदाही १५० फिरते हौद विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विसर्जनाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी फिरते हौद एकाच ठिकाणी उभे असल्याचे चित्र दिसून आले होते. तसेच लोखंडी टाक्या आणि बांधीव टाक्यांमध्ये अस्वच्छता असल्याच्या तक्रारी भाविकांकडून करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर टाक्यांची स्वच्छता करण्यात आली असून, फिरत्या हौदांचे ठिकाण ऑनलाइन पद्धतीने पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे.
पंधरा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण ४२ बांधलेले हौद, २६५ ठिकाणी ५६८ लोखंडी टाक्या विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच २५२ ठिकाणी मूर्ती संकलन, मूर्तीदान केंद्र उभारण्यात आले आहेत. निर्माल्य संकलनाची २५६ ठिकाणी सुविधा देण्यात आली असून विसर्जनाची सर्व माहिती http://www.pmc.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
आणखी वाचा-पुणे: भाविकांचा मेट्रोकडे ओढा! रात्री उशिराच्या सेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद
‘पीएमसी केअर’वर विसर्जनाची माहिती
महापालिकेच्या ‘पीएमसी केअर’ या उपयोजनावर (ॲप) विसर्जनाची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. तसेच गणेशोत्सवातील ब्लाॅग्स, लेखही वाचता येतील. नागरिकांना जवळचा विसर्जन घाट, मूर्ती संकलन आणि दान केंद्र, गणेश मंडळे, वाहनतळांची जागा, बंद असलेले रस्ते, पर्यायी मार्ग याची माहिती मिळणार आहे. एखाद्या इच्छित ठिकाणी कसे पोहोचायचे याचा नकाशाही मिळणार आहे. https://fxurl.co/rFshd तसेच https://fxurl.co/4Ijj123 या लिंकवरून पीएमसी केअर ॲप डाऊनलोड करता येणार आहे.