scorecardresearch

Kasba and Chinchwad Election : प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आचारसंहितेचे नियम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत.

election commission
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आचारसंहितेचे नियम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ, राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ, सभेसाठी ध्वनिवर्धक आणि इतर सुविधांसाठी परवानगी घ्यावी. मिरवणुकीसाठी पोलिसांची आगाऊ परवानगी घ्यावी. मिरवणूक जाणाऱ्या भागांत कोणताही निर्बंधक आदेश असल्यास, त्याचे पालन करावे, निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या उमेदवार व त्यांच्या निवडणूक मतदार प्रतिनिधींना मतदान कक्षात प्रवेश करता येईल, इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी तिला प्रवेश करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा >>> कसबा आणि चिंचवडमध्ये उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच आचारसंहिता भंगाच्या ५२ तक्रारी

सत्ताधारी पक्ष / शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्य कोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही. मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणे. आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे या गोष्टींना मनाई आहे. कोणाचीही जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने यांवर मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय (जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता), झेंडे लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी वापर करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 18:23 IST