scorecardresearch

पुणे : मेट्रो मार्गिका २६ जानेवारीला सुरू करण्याच्या आश्वासनाचे काय झाले?, मोहन जोशी यांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल

या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोची प्रवासी सेवा २६ जानेवारीपासून सुरू होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.

pune metro chandrakant patil
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गिकेवरील मेट्रो २६ जानेवारीपर्यंत धावेल, या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनाचे काय झाले, अशी विचारणा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी येथे केली.

या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोची प्रवासी सेवा २६ जानेवारीपासून सुरू होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मोहन जोशी यांनी ही विचारणा करत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. जनतेला आश्वासनं द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत, ही भाजपची कार्यपद्धती आहे. महागाई कमी करू, अच्छे दिन आणू, इंधनाचे दर नियंत्रणात ठेवू अशी असंख्य आश्वासने भाजप नेत्यांनी दिली. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करण्यास बांधील आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ भूमिकेबद्दल आभार – चंद्रकांत पाटील

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही हाच प्रकार केला आहे. मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यासंदर्भात नवीन आश्वासन देताना त्याची खंत त्यांना वाटत नाही. त्यामुळे २६ जानेवारीचा मुहूर्त हुकल्यानंतर आता मार्च महिन्यात सेवा सुरू होईल, असे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी आता मंत्रीपदाच्या खात्यामध्ये आश्वासनमंत्री म्हणून नवे खाते स्वीकारावे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 10:15 IST