पुणे : इतिहासाचा सर्वच क्षेत्रांतील ठेवा त्या त्या शहर आणि राज्यांतील संग्रहालयांमध्ये दडलेला असतो. भौगोलिक-आर्थिक-सामाजिकदृष्टय़ा असलेले हे संचित जपण्यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यभरातील संग्रहालयांच्या माहितीची सूची तयार करण्याचे काम पहिल्यांदाच त्यातून होणार आहे.

  पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या अखत्यारित राज्यभरातील तेरा संग्रहालये आहेत. मात्र विद्यापीठांतील शैक्षणिक विभागांची संग्रहालये, राज्यभरातील विविध संस्था, वैयक्तिक संग्रहालयांची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध नाही. ही उणीव दूर करण्यासाठी सर्व प्रकारच्या संग्रहालयांच्या माहितीचे संकलन करून त्यांची सूची तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत जवळपास १२५ संग्रहालयांची माहिती उपलब्ध झाली आहे. येत्या काळात त्यात आणखी भर पडेल. संग्रहालयांची माहिती संकलित झाल्यावर त्यांची सूची तयार करण्यात येईल. ही सूची संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल, असे पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले. राज्यातील संग्रहालय चळवळीला प्रोत्साहन मिळण्यासाठी या संग्रहालयांना अनुदान किंवा काही योजना राबवण्याची कल्पना आहे. त्या दृष्टीने ही सूची उपयुक्त ठरेल, असेही डॉ. गर्गे यांनी नमूद केले.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
pune c dac marathi news, c dac campus placements marathi news
सीडॅकच्या ‘प्लेसमेंट्स’ना फटका; दरवर्षीच्या तुलनेत यंदा नोकऱ्यांमध्ये घट
mumbai seven lakes have 27 percent water storage
मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर; जलचिंता वाढली, राज्यातही टंचाईचे सावट

माहिती पाठवण्यासाठी आवाहन

संग्रहालयांच्या माहितीचे संकलन आणखी काही काळ करण्यात येणार आहे. त्यामुळे संग्रहालयांची माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती पाठवण्यासाठी संग्रहालयाचे नाव आणि संपूर्ण पत्ता, संग्रहालयाच्या इमारतीचे छायाचित्र, संग्रहालयाचा प्रकार, संपर्क क्रमांक आणि ई मेल पत्ता, संकेतस्थळ, व्यवस्थापन प्रकार (शासकीय/ खाजगी/ विश्वस्थ संस्थेद्वारे संचालित), संग्रहालय अभिरक्षकाचे नाव, वेळ, प्रवेश शुल्क, संग्रहालयाचा इतिहास, प्रदर्शन दालनाची संख्या, संग्रह (एकूण कलाकृती), संग्रहालयाद्वारे चालणारे उपक्रम, संग्रहाची छायाचित्रे आदी माहिती  maharashtramuseum@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवण्याचे आवाहनही डॉ. गर्गे यांनी केले आहे.

काय होणार?

या सूचीमुळे अंतर्गत शासकीय, विद्यापीठे, संस्था आणि वैयक्तिक संग्रहालयांची माहिती संकलित करून त्यांची सूची तयार करण्यात येणार असून, संग्रहालय चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी या संग्रहालयांना अनुदान किंवा तत्सम योजना राबवण्याची कल्पना आहे.

थोडी माहिती..

भारतात पहिले संग्रहालय कोलकाता येथे १८१४ मध्ये एशियाटिक सोसायटीद्वारे उभारण्यात आले. हे जगातल्या मोठय़ा संग्रहालयांपैकी एक म्हणून ओळखले जाते.