scorecardresearch

सार्वजनिक खासगी लोकसहभागातून रस्ते विकसनाला चालना

अंदाजपत्रकात प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामांना गती देण्यात अपयशी ठरल्यानंतरही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आगामी आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये नव्याने सहा उड्डाणपुलांची कामे प्रस्तावित केली आहेत.

पुणे : अंदाजपत्रकात प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामांना गती देण्यात अपयशी ठरल्यानंतरही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आगामी आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये नव्याने सहा उड्डाणपुलांची कामे प्रस्तावित केली आहेत. यामध्येही काही जुन्या उड्डाणपुलांच्या कामाचा समावेश आहे. दरम्यान, वाहतूक सुधारणेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी वर्षभरात उपाययोजना होण्याबाबत संदिग्धताच आहे. तर सार्वजनिक खासगी लोकसहभागातून विकास आराखडय़ातील रस्ते करण्यासही प्राधान्य देण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिका अंदाजपत्रकामध्ये रस्ते विकसन आणि उड्डाणपुलांच्या उभारणीला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार विश्रांतवाडी येथे महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्येही येथे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. त्यासाठी सल्लागराची नियुक्ती करण्यात आली असून पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले आहे. खराडी बाह्यवळण चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे नियोजन असून त्यासाठी आट कोटी रुपये तरतूद निश्चित करण्यात आली आहे.

साधू वासवानी पूल (कोरेगांव पार्क) ते बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडय़ाअंतर्गत विविध कामे करण्यात येणार असून पुलाचे पुनर्निर्माण करण्यासाठी वीस कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. करिश्मा चौक ते कर्वे पुतळा उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्यासाठी पंधरा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अ‍ॅम्ब्रोसिया रिसॉर्ट ते बावधन उड्डाणपूलही नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यासाठीही तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सिंहगड रस्ता येथील सनसिटी ते कर्वेनगर या भागाला जोडण्यासाठी नदीवर पूल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे वाहतुकीचे अंतर कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या पुलासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली होती. मात्र अद्यापही या पुलाच्या कामाला गती मिळालेली नाही. तसेच पाषाण-पंचवटी-कोथरूड हा भाग बोगद्याद्वारे जोडला जाणार आहे. त्यासाठी पर्यावरणीय मूल्यांकन अभ्यास, तांत्रिक तपासणी आणि अन्य कामांसाठी दोन कोटीं खर्च करण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Promoting road development through public private partnership ysh

ताज्या बातम्या