पुणे: ‘एक जिल्हा-एक नोंदणी’ या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मिळकतींच्या व्यवहारांची दस्तनोंदणी शहरात सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारही करता येणार आहे. शहरातील पाच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातून दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना या सुविधाचा लाभ मिळणार आहे.
शहरासह जिल्ह्यातील औद्योगिकीकरण, माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांमुळे वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे दस्तनोंदणीसाठी शहरातील कार्यालयांत सातत्याने गर्दी होत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतींची दस्तनोंदणी करण्यासाठी पाच दुय्यम निबंधक कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमाचा लाभ आता ग्रामीण भागातील नागरिकांनाही होणार आहे.ग्रामीण भागात इमारती, रो-हाऊस जमिनींचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
ग्रामीण भागातील मिळकतींचे दस्त प्रामुख्याने तालुक्यांच्या ठिकाणीच नोंदविले जातात. या ठिकाणी गुंतवणूक करणारे प्रामुख्याने मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांतील नागरिक असून, मिळकतींच्या व्यवहारांची दस्तनोंदणी करायची झाल्यास त्यांना ती सोमवार ते शुक्रवार या कालावधीत करावी लागत होती. त्यामुळे या नागरिकांचीही अडचण होत होती. मात्र, आता शहरातील पाचही दुय्यम कार्यालयांत शहराप्रमाणेच सुटीच्या दिवशीही ग्रामीण भागातील दस्तनोंदणी करता येणार आहे.
‘एक जिल्हा-एक नोंदणी’ धोरणामुळे जिल्ह्यातील कोणत्याही गावांतील दस्त शहरातील ग्रामीण भागातील कोणत्याही दुय्यम निबंध कार्यालयामध्ये नोंदविता येणार आहेत. या सुविधेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारीही ठरावीक पाच दुय्यम निबंध कार्यालयांत मिळकतींच्या व्यवहारांची दस्तनोंदणी करता येणार आहे,’ असे सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले.चाैकट
सासवडमध्ये बनावट व्यक्तीद्वारे दस्तनोंदणी?राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने सुरू केलेल्या ‘वन डिस्ट्रिक्ट-वन रजिस्ट्रेशन’ योजनेचा गैरफायदा घेऊन दुसऱ्या तालुक्यात जाऊन दस्तनोंदणी करून फसवणूक करण्याचे प्रकार होत असून, सासवड येथील दस्तनोंदणी कार्यालयात बनावट व्यक्ती उभी करून दोन दस्तांची नोंदणी करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. सासवड येथे बनावट व्यक्तीद्वारे दोन दस्तनोंदणी केल्याचा प्रकार घडल्याची तक्रार स्वाभिमानी ब्रिगेडचे संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे-पाटील यांनी केली आहे.