पुणे : डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेने देशभरात विविध ठिकाणी केलेल्या उत्खननातून हाती आलेल्या दुर्मीळ वस्तू आणि नमुन्यांच्या जतनासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वित्त विभागाकडे दहा कोटींच्या निधीचा प्रस्ताव सादर केला आहे. आता वित्त विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास डेक्कन कॉलेजला निधी उपलब्ध होऊ शकेल.
डेक्कन कॉलेजने देशभरातील विविध ठिकाणी अभ्यासासाठी उत्खनन केले आहे. त्यातून मानवी सांगाडे, झाडांची पाने आणि मुळे, मातीची भांडी,धान्य, शिंपले, दगड आणि मातीचे नमुने अशा विविध प्रकारच्या या वस्तू आणि नमुने हाती आले आहेत. या वस्तू आणि नमुने हडप्पाकालीन किंवा त्यानंतरच्या काळातील आहेत. मात्र या वस्तूंच्या जतनासाठी जागा पुरत नसल्याने त्या पिशव्यांमध्ये भरून ठेवल्याचे किंवा उघडय़ावर असल्याचे आढळून आले होते. या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केले होते. त्यानंतर विधानसभा अधिवेशनामध्ये या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी डेक्कन कॉलेजचे द्विशताब्दी वर्ष आणि बांधकामासाठी वित्त विभागाकडे निधीची मागणी केल्याचे उत्तर दिले होते.
या पार्श्वभूमीवर सामंत यांच्याकडे विचारणा केली असता डेक्कन कॉलेजसाठी दहा कोटींच्या निधीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांत डेक्कन कॉलेजला भेट देणार आहे. संस्थेला आवश्यक असलेल्या निधीसंदर्भात वित्त विभागाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच डेक्कन कॉलेजमध्ये रिक्त असलेली काही पदेही भरण्यात येणार आहेत. त्या बाबतचा निर्णयही घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय
डेक्कन कॉलेजकडे असलेल्या दुर्मीळ वस्तू आणि नमुन्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय करण्याचा मानस आहे. या द्वारे या दुर्मीळ वस्तू आणि नमुन्यांचे योग्य पद्धतीने जतन होऊ शकेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.