प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

पुण्यातील बालगंधर्व चौकात प्रविण दरेकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिलांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले

Protest by NCP Women Congress in Pune
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिलांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काल एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाला रंगलेल्या गालाचे मुके घेण्याची सवय आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाच्या निषेधार्थ आज पुण्यातील बालगंधर्व चौकात प्रविण दरेकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिलांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी आणि शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “काल एका कार्यक्रमात महिलांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जे विधान केले आहे. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. प्रविण दरेकर यांची नगरसेवक होण्याची लायकी नाही. ते विरोधी पक्षनेते झाले आहेत,” अशा शब्दात त्यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला.

“प्रविण दरेकर हे २००९ साली मनसेच्या आणि नंतर च्या भाजपच्या लाटेत आमदार झाले आहे. त्यामुळे अशा व्यक्तिने बोलताना भान ठेवून बोलावे. जर त्यांनी येत्या ४८ तासात केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली नाही तर महिला राज्यभर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा जगताप यांनी दिला.

यावेळी महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी म्हणाल्या की, “आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असताना. प्रविण दरेकर यांनी जे विधान केले आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी. अन्यथा आम्ही गालाचा रंग काय असतो, हे दाखवून देऊ,” असा इशारा त्यांनी दरेकर यांना दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Protest by ncp women congress in pune against pravin darekar statement srk 94 svk