बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. सरकारने शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी शनिवारी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. राज्यात प्रथमच बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी व्यापक आंदोलन होत आहे. अनेक शेतकरी आपल्या बैलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून ‘पेटा’ या संस्थेविरोधात जनआंदोलन उभारले आहे.

यावेळी बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्या प्राणीमित्रांचा जाहीर निषेध करण्यात आला. आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. चाकणमधील मार्केट यार्डपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. ‘प्रत्येक प्राण्याला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे,’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी आणली होती. प्राण्यांच्या हक्कांची संकल्पना व्यापक करतानाच या हक्कांना घटनात्मक अधिकारांचा दर्जा देण्यासाठी संसदेने प्रयत्न करावा, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.