महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेच्या वतीने शिक्षक आयुक्त कार्यालयाबाहेर १९ जुलैपासून प्राध्यापक अनेक मागण्यासाठी आंदोलनास बसले आहे. आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्याने आज आंदोलनाचा ४९वा दिवस असल्याने आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधत प्राध्यापकांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासून सरकारचा निषेध व्यक्त केला. तर त्याच
ठिकाणी काही शिक्षिकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं असून त्यांनी आपले केस कापून निषेध नोंदवला आहे.

काय आहेत ह्या प्राध्यापकांच्या मागण्या?

  • सहाय्यक प्राध्यापक पदभरतीवरील बंदी तात्काळ उठवावी आणि विनाअट १०० % प्राध्यापक पदभरती महाविद्यालये आणि अकृषी विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागात त्वरित सुरू करावी.
    ऑक्टोबर २०१७ च्या आकृतीबंधाला अंतिम मंजुरी देऊन आज (जून २०२१) पर्यंतची सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत.
  • CHB (तासिका तत्त्व) ला पर्याय व्यवस्था म्हणून केंद्रीय विद्यापीठाच्या धर्तीवर प्रतिदिवस १५०० रु. मानधन देऊन प्राध्यापकांची नेमणूक वर्षातील ११ महिन्यांसाठी करण्यात यावी.
    तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरण्यात यावा.
  • शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये CHB प्राध्यापकांची नियुक्ती १ नोव्हेंबर २०२० पासून गृहीत धरून त्यांना पूर्ण शैक्षणिक वर्षांचे मानधन देण्यात यावे. २४ फेब्रुवारी २०२१ चे आपले पत्र रद्द करावे.
  • मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड या अकृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील मानव्यविद्याशाखांतर्गत येणाऱ्या सर्व विषयांच्या दुसर्‍यापदाला तात्काळ मान्यता देण्यात यावी, अथवा सर्व विद्यापीठांचा कार्यभार एक समान करावा.
  • राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील कायमस्वरुपी विनाअनुदानित तुकड्यांना आणि कायमस्वरुपी विनाअनुदानित महाविद्यालयांना तात्काळ अनुदान द्यावे.
  • राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे शासकीय महाविद्यालये तात्काळ सुरु करावीत.