शुल्कवाढ, पायाभूत सुविधा, एनएफएआय-एनएफडीसी विलीनीकरणाचे मुद्दे
पुणे : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) गुरुवारी पहिल्यांदाच भेट दिली. मात्र पहिल्याच भेटीत ठाकूर यांना विद्यार्थ्यांनी केलेली निदर्शने पाहावी लागली.
एफटीआयआयच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने ठाकूर यांनी संस्थेला भेट दिली. एफटीआयआयचे अध्यक्ष शेखर कपूर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा, संचालक संदीप शहारे आदी या वेळी उपस्थित होते. ठाकूर यांनी या भेटीदरम्यान संस्थेतील प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याशीही संवाद साधला. तसेच ठाकूर यांच्या हस्ते लेन्साइट या नियतकालिकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले.
ठाकूर म्हणाले, दूरचित्रवाणी, चित्रपट या क्षेत्रांसह अॅधनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स अशा क्षेत्रांतही एफटीआयआयला कसे पुढे आणता येईल, या दृष्टीने आढावा बैठकीत चर्चा झाली. जगात आशय निर्मितीचे भारत हे केंद्र होण्यासाठी आपली लेन्स आणि उद्दिष्ट पुनस्र्थापित करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्थांबरोबरच्या सहकार्याद्वारे एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या गोष्ट सांगण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होऊ शकेल. एफटीआयआयने विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेच्या गुणांना प्रोत्साहन देऊन चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांच्या नवउद्यमी निर्माण कराव्यात.
ठाकूर यांच्या भेटीदरम्यान शुल्कवाढ, पायाभूत सुविधा, एनएफएआय-एनएफडीसीचे विलीनीकरण अशा विविध मुद्दय़ांबाबत एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेकडून निदर्शने करण्यात आली. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत माहिती घेण्यासाठी केवळ दोन मिनिटांचा वेळ दिला. त्यामुळे फार काही बोलणे होऊ शकले नाही, असे संघटनेच्या अध्यक्ष अंकिता बसर्गेकर यांनी सांगितले. ठाकूर यांनी निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये केलेले ‘देश के गद्दारों को, गोली मारों सालों को’ हे विधान देशाच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का पोहोचवणारे आहे. एफटीआयआयने नेहमीच लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्रागतिक वातावरणाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या विचाराला विरोध दर्शवण्यासाठी निदर्शने करण्यात आल्याची भूमिका संघटनेकडून मांडण्यात आली.