पुणे: कर्करोगावरील अत्यंत प्रभावी मानली जाणारी ‘प्रोटॉन थेरपी’ आता शासन आणि रुबी हॉल यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात सर्वसामान्यांना परवडेल अशा अत्यंत कमी खर्चात सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा सध्या केवळ मुंबईत उपलब्ध आहे.

गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग आणि रुबी हॉल क्लिनिक यांच्यात मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस रुबी हॉल रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. सायमन ग्रँड, आरोग्य विभागाचे सहसचिव डॉ. मिलिंद कदम, वैद्यकीय सहायता कक्षाचे कौस्तुभ थोरात, प्रसाद बिराजदार आणि गणेश तिकोने उपस्थित होते. त्यात विविध निर्णय घेण्यात आले.

यातील निर्णयांनुसार, महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत आता रुबी हॉल क्लिनिकसारख्या अंगीकृत रुग्णालयामध्ये कार्डियाक (हृदयरोग) आणि कर्करोग उपचारांसाठीसुद्धा सर्वसामान्य रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, अवयव प्रत्यारोपणासारख्या अत्यंत महागड्या शस्त्रक्रियांसाठी शासकीय योजनेची मर्यादा ओलांडल्यास, उर्वरित खर्चासाठी विशेष ‘शासकीय कॉर्पस फंड’मधून अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून अवयव दान आणि प्रत्यारोपण मोहिमेला गती मिळेल.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि कर्नाटक सीमावर्ती भागातील ग्रामीण रुग्णांना महागड्या चाचण्यांसाठी पुणे-मुंबईची वारी करावी लागू नये, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे रुबी हॉलच्या माध्यमातून माफक दरात अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर उभारले जाणार आहे. खासगी रुग्णालये आणि शासकीय योजनांच्या समन्वयातून ही केंद्रे उभारली जाणार आहेत.