scorecardresearch

मुंढवा जॅकवेलमधून वर्षाला साडेसहा टीएमसी पाणी द्या – जलसंपत्ती प्राधिकरणाचे पुणे महापालिकेला आदेश

शहराच्या पाणी वापराबाबत जलसंपत्ती प्राधिकरणाकडे झालेल्या सुनावणीत आदेश देण्यात आले आहेत.

(संग्रहीत छायाचित्र)

खडकवासला धरणातून पाण्याची मागणी कमी करावी, तसेच मुंढवा जॅकवेलमधून प्रक्रिया केलेले साडेसहा अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी दरवर्षी सिंचनासाठी उलब्ध करून देण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (महाराष्ट्र वॉटर रिर्सोसेस रेग्लुलेटरी ॲथॉरिटी – एमडब्ल्यूआरआरए) पुणे महापालिकेला दिले.

शहराच्या पाणी वापराबाबत जलसंपत्ती प्राधिकरणाकडे झालेल्या सुनावणीत हे आदेश देण्यात आले आहेत. “महापालिका सध्याच्या पाण्याच्या वापराच्या ८० टक्के क्षमतेच्या म्हणजेच १४३० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) (१७८७ एमएलडी पाण्याच्या वापरापैकी ८० टक्के) क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे (एसटीपी) नियोजन करत नाही. खडकवासला प्रकल्पातून पाण्याची मागणी कमी झालेली नाही. महापालिकेने आपल्या पाण्याचा वापर आरक्षणानुसार न करता पाण्याच्या अंदाजपत्रकानुसार मर्यादित केला पाहिजे.”, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे यांनी सुनावणी दरम्यान सांगितले.

तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी सल्लागाराची नियुक्ती –

“महापालिका राज्य सरकारच्या आरक्षणानुसार पाणी उचलत आहे आणि वितरण व्यवस्थेतील तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करत आहे. मात्र, शहराच्या भौगोलिक स्थितीमुळे वेळ लागत आहे. करोनामुळे नवीन जलवाहिनी टाकण्याचे आणि जलमापक बसविण्याचे काम मंदावले असल्याने ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जलवाहिनी टाकण्याचे काम ६१.७१ टक्के, तर नवीन जलमापक बसविण्याचे काम २९ टक्के पूर्ण झाले आहे. बावधन येथील जलस्त्रोत संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करून विकास परवानग्या न देण्याच्या सूचना इमारत विभागाला देण्यात आल्या होत्या. तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येत आहे. गळती कमी करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्यानंतर सन २०२५ पर्यंत आवश्यक असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पांची एकूण क्षमता दैनंदिन ९७८.५ एमएलडी एवढी असेल.”, असे महापालिकेचे अनिरुद्ध पावसकर यांनी सुनावणी दरम्यान सांगितले.

पुढील सुनावणी १९ मे रोजी –

शहराच्या पाण्याबाबत जलसंपत्ती प्राधिकरणाकडे दाद मागितलेले विठ्ठल जराड यांनी सांगितले, की “जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये महापालिकेचा पाणी वापर १४५० एमएलडी होता. मात्र, महापालिका आणि जलसंपदा विभाग या दोन्ही यंत्रणांचे पाणी वापर विदावर एकमत नाही. महापालिकेचा पाणीवापर नियमानुसार होत नसल्याने शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यापासून वंचित राहतात. त्यावर पाण्याचा वापर तपासण्यासाठी महापालिकेच्या जलकेंद्रांत प्रवेश करण्याची परवानगी मिळत नसल्याचे चोपडे यांनी सांगितले. त्यावर महापालिकेच्या जलकेंद्रांमध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रवेश देण्याबाबत प्राधिकरणाने निर्देश दिले. पुढील सुनावणीची तारीख १९ मे रोजी दुपारी तीन वाजता निश्चित करण्यात आली आहे.”

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Provide 6 point 5 tmc of water per year from mundhwa jackwell water resources authority orders pune municipal corporation pune print news msr

ताज्या बातम्या