पुणे : पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशीरा प्रसिद्ध झाल्याचे अनेक उमेदवारांची संधी हिरावली जाणार असल्याचे सांगत वयोमर्यादेत मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. ४ जानेवारीला राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५साठीची प्रवेशपत्रे, मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, अद्याप वयोमर्यादा वाढीबाबत निर्णय झालेला नाही. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनंतर आता सत्ताधारी पक्षातील आमदारांनीही वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीच्या सुरात सूर मिसळला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी पीएसआय पदासाठी वयोमर्यादा वाढण्याची मागणी समाजमाध्यमातून केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच माजी आमदार बच्चू कडू यांनीही मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावाचून पर्याय नसल्याची भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पीएसआय वयोमर्यादा वाढवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. ‘पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वय मर्यादा खुला प्रवर्गास ३१ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ३४ वर्षे आहे. संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ जाहिरात २९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. उपरोक्त जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे. त्यातही वयोमर्यादा गणना पुढील तारीख नमूद केली आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरत आहेत.

मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ जाहिरात उशीरा आल्याने आपण शासन निर्णय क्रमांक २०२४/प्र. क्र. ३९/४५५२ (सेवा) दिनांक २० डिसेंबर २०२४ नुसार १ वर्ष वय सवलत दिली होती. तसेच आपल्या सरकारने २०२५ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठी वय सवलत दिली आहे. त्या अनुषंगाने अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी १ वर्ष वय सवलत मिळावी किंवा वय मर्यादा गणना कालावधी तरी १ जानेवारी २०२५ गृहीत धरला जावा, अशी मागणी एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत आहे. तरी वरील नमूद मुद्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एकीकडे वयोमर्यादा वाढवण्याच्या मागण्या सातत्याने होत असल्या, तरी त्या बाबत शासन स्तरावरून निर्णय झालेला झालेला नाही. एमपीएससीने परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीतील उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोवत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन. परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही कारची जबाबदारी राहण