केव्हाही पाऊस पडेल अशी ढगाळ हवा.. भरून आलेले आभाळ.. तिन्हीसांजेची कातरवेळ.. वाऱ्याने लागलेली गारव्याची चाहूल.. मोहवून टाकणारा मोगऱ्याचा गंध.. तानपुऱ्याच्या नादामध्ये रंगलेली आलापी.. पखवाजच्या साथीने रंगलेली सुरेल मैफल.. अशा भारलेल्या वातावरणात घराणेदार गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पं. मुकुल शिवपुत्र यांच्या गायकीतून धृपद गायकीची प्रचिती आली. शिवमंदिरामध्ये घुमणारे धृपदचे सूर बुधवारी सरस्वतीचे लेणं घेऊन आलेल्या कंठातून स्वरांचं चांदणं होऊन बरसले.
श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य जयंतीचे औचित्य साधून श्री शंकराचार्य मठामध्ये पं. मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाची मैफल झाली. रागगायनापेक्षाही रसिकांना काही वेगळे ऐकविण्याचा त्यांचा मानस होता. तानपुऱ्यावर आलापी होताच मुकुल यांनी ‘रुम झुम बदरवा आयी’ ही मियाँ तानसेन यांची धृपदमधील चौतालाची रचना सादर केली. त्यालाच जोडून ‘जो बन मदमाती गुजरीया’ ही धमार तालाची रचना सादर केली.
‘रघुवर राम सम गुणसागर’ ही धमारमधील रचना आणि त्यालाच जोडून तराणा सादर केला. त्यांना प्रकाश शेजवळ यांनी पखवाजची, भरत कामत यांनी तबल्याची, स्वरूप सरदेशमुख आणि अमेय गोरे यांनी तानपुऱ्याची साथसंगत केली. ‘छलवा ना डारो गुलाल’ या दीपचंदी तालातील भैरवीने मुकुल शिवपुत्र यांच्या मैफलीची सांगता झाली. स्वरांच्या या अद्भूत आविष्कारामध्ये मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांना दीड तास कसा निघून गेला हे समजलेच नाही. किशोर जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
पं. मुकुल शिवपुत्र गायनापूर्वी प्रकाश शेजवळ यांचे पखवाजवादन झाले. त्यांना मयंक टेंगसे यांनी संवादिनीवर लेहरा साथ केली. प्रकाश यांचे वडील अर्जुन शेजवळ यांच्याकडे मुकुल शिवपुत्र यांनी पखवाजवादनाचे शिक्षण घेतले होते.
त्यामुळे प्रकाश यांचे पखवाजवादन सुरू असताना मुकुल शिवपुत्र यांनी मांडीवरच ताल धरीत या वादनाला आपल्या पद्धतीने दाद दिली.