मराठीतील अभिजात साहित्य डिजिटल विश्वामध्ये येण्यापासून लेखकांच्या वारसदारांचा अडसर ठरत आहे. या वास्तवावर महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी शनिवारी बोट ठेवले. साहित्य डिजिटल माध्यमामध्ये आले तरी छापील पुस्तकांचे महत्त्व कमी होणार नाही, असेही ते म्हणाले.
जे. एफ. एडवर्ड्स यांच्या ‘तुकारामबुवांचे धर्मविचार’ या दुर्मिळ पुस्तकाच्या डिजिटल आवृत्तीच्या प्रकाशनाने महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटलायझेशन प्रकल्पाचा शुभारंभ विवेक सावंत यांच्या हस्ते झाला. परिषदेतर्फे जनवाणी संस्थेच्या सहकार्याने वारसा सप्ताह आणि जागतिक ग्रंथदिनाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या दुर्मिळ ग्रंथ आणि नियतकालिकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पुरातत्त्वशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते झाले. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन आणि जनवाणीच्या समन्वयक प्राजक्ता पणशीकर या वेळी उपस्थित होत्या.
पाश्चात्त्य राष्ट्रांनी त्यांच्या लेखकांना डिजिटल माध्यमाद्वारे जतन करून जगासाठी खुले केले आहे. ‘प्रोजेक्ट गटेनबर्ग’ पाहून ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून मलाही आपल्या मराठी लेखकांचे साहित्य डिजिटल माध्यमामध्ये न्यावे असे वाटले. त्यादृष्टीने मी लेखकांच्या वारसदारांशी संपर्क साधला, पण मराठी साहित्यच नव्हेतर, लेखकांच्या भावी पिढय़ा यादेखील व्यामिश्र आहेत याची प्रचिती आली, असे सांगून विवेक सावंत म्हणाले, वास्तविक यामध्ये आमचे पैसे खर्च होणार होते. हे ध्यानात न घेताच या प्रकल्पाची माहिती दिल्यानंतर ‘तुम्हाला यातून काय मिळणार’ अशी विचारणा माझ्याकडे करण्यात आली. हाच प्रश्न मी विचारला तेव्हा ‘आमची दोन हजारांची आवृत्ती खपल्यावर दोन हजारांची रॉयल्टी मिळते’ असे सांगण्यात आले. त्यामुळे हा प्रकल्प बारगळला. कॉपीराईट कायद्यानुसार ही पुस्तके खुली होतील तेव्हा हा प्रकल्प राबविण्याचा विचार करता येईल.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटलायझेशनच्या प्रकल्पासाठीचा कालबद्ध प्रकल्प अहवाल ‘एमकेसीएल’ला सादर करावा. तज्ज्ञ मनुष्यबळाची उपलब्धता आणि जागा या बाबींचा विचार करून हा अहवाल आल्यानंतर आठवडय़ामध्ये काय करता येईल हे सांगू शकेन असे आश्वासन सावंत यांनी दिले. जगभरात छापील साहित्य आणि डिजिटल साहित्य गुण्यागोविंदाने नांदत आहे, असे सांगितले.
नव्याची कास धरताना जुन्यातही सोने असते याची जाणीव करून देणारे हे प्रदर्शन असल्याचे डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ग्रंथ जुने होतात, पण विचार जुने होत नाहीत. त्यामुळे जुन्या ग्रंथांकडे आईच्या वात्सल्याने पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. परिषदेच्या संग्रहातील तीन हजार ग्रंथांपैकी ३०० दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून त्यासाठी सरकार आणि उद्योगांनी अर्थसाहय़ करावे, असे आवाहन करण्यात येणार असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. महेंद्र मुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले.