पुणे : कवयित्री सुचेता जोशी-अभ्यंकर यांच्या अमृतरेषा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका, समीक्षक माधवी वैद्य यांच्या हस्ते नुकतेच झाले. बुकगंगा प्रकाशनाच्या वतीने हा संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.
‘मानवी मनाच्या आंतरिक भावना सहजपणे उलगडणाऱ्या सुचेता जोशी यांचा ‘अमृतरेषा’ काव्यसंग्रह ‘अमलताशा’च्या फुलांप्रमाणे बहरून आलेला आहे. समीक्षक म्हणून त्यांच्या काव्यात भावनांचा, भाषेचा बहर प्रत्येक ठिकाणी दिसून येतो. बालपणापासून लय, ताल आणि सूर यामधील सुचेता यांची मुशाफिरी आता शब्दांचे गोफ विणण्यात सहज रमून गेली आहे. तिची अनोखी ‘अमृतरेषा’ रसिकांना भावेल, असा विश्वास वाटतो,’ असे प्रतिपादन वैद्य यांनी केले.
प्रकाशनप्रसंगी प्रकाशक गौरी जोशी, विलास जोशी, डॉ. अभिजित अभ्यंकर, काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ साकारणाऱ्या मुक्ता अभ्यंकर, प्रतिमासंयोजन करणारे विनय बर्दापूरकर आणि अजित ठोंबरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुचेता यांच्या कवितांवर आधारित, त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या ‘अमलताश’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. सुचेता यांच्यासह प्राजक्ता रानडे, हृषीकेश रानडे, अपर्णा केळकर यांनी गीतांचे सादरीकरण केले. त्यांना रमाकांत परांजपे, केदार परांजपे, मिलिंद गुणे, नीलेश देशपांडे, अभय इंगळे, विक्रम भट यांनी साथसंगत केली. अमित सोमण यांनी ध्वनिसंयोजन केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.