पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठी प्रकाशक परिषदेने घेतला आहे. संमेलन कालावधीतच गोरेगाव येथे प्रबोधन संस्थेच्या सहकार्याने ‘चार दिवस पुस्तकांचे’ हे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
मराठी प्रकाशक परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत संमेलन बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष रमेश कुंदुर, कार्याध्यक्ष अरुण जाखडे, कार्यवाह अनिल कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष अरिवद पाटकर या वेळी उपस्थित होते. घुमान येथे ग्रंथ प्रदर्शनामध्ये सहभाग असावा यासाठी रामदास फुटाणे यांच्यासमवेत आम्ही सातत्याने चर्चा करीत होतो. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने संमेलनासंदर्भात साहित्य महामंडळ आणि संयोजन समितीशी कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याचे थांबवल्याचे अरुण जाखडे यांनी सांगितले. घुमानबरोबरच राज्यामध्येही एखादे संमेलन घेतले जावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हे शक्य नसेल तर विभागीय ग्रंथप्रदर्शने भरवावीत असेही सुचविण्यात आले होते. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घुमानमध्ये मराठी माणसे नसल्याने ग्रंथविक्री कितपत होईल याबाबत साशंकता होती.  तिकडे पुस्तके घेऊन जाणे शक्य नव्हते. विभागीय पातळीवर ग्रंथ प्रदर्शने भरवावीत असे  सुचवण्यात आले होते. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.
– अरुण जाखडे, कार्याध्यक्ष, मराठी प्रकाशक परिषद