Pooja Khedkar Encroachment on Footpath : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यांच्या कुटुंबाच्या आणखी एका प्रतापामुळे हे कुटुंब चर्चेत आलं आहे. पुणे महानगरपालिकेने बाणेर येथील खेडकर कुटुंबीयांच्या बंगल्याबाहेरील अतिक्रमणाविरोधात कारवाई केली आहे. खेडकर कुटुंबाने घराबाहेरील पदपथावर अतिक्रमण केलं होतं, जे हटवण्यासाठी आज (१७ जुलै) पालिकेला बुलडोझर चालवावा लागला. खेडकर कुटुंबाने बंगल्याबाहेरील पदपथावर अतिक्रमण करून तिथे झाडं लावली होती. बंगल्याचं सुशोभीकरण करण्यासाठी एक कठडा बांधून त्याच्या आत झाडं लावण्यात आली होती. आज खेडकर कुटुंब आणि महापालिकेने या अतिक्रमणाविरोधात कारवाई केली.

खेडकर कुटुंबाने बंगल्याबाहेरील पदपथावर केलेलंअतिक्रमण हटवण्यासाठी पुणे महापालिकेने खेडकरांना नोटीसही बजावली होती. पालिकेने नोटीस बजावल्यानंतरही खेडकर कुटुंबाने त्या नोटिशीला प्रतिसाद दिला नव्हता. अखेर पालिकेने हे अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोझर चालवला. पुणे महापालिकेने १३ जुलै रोजी पूजा खेडकर यांची आई, मनोरमा खेडकर यांना औंधमधील बाणेर रोडवरील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील निवासस्थानाबाहेरील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याबद्दल नोटीस बजावली होती. या नोटिशीत म्हटलं होतं की महापालिकेला असं आढळून आलंय की तुमच्या घराबाहेरील पदपथावर ६० फूट लांब आणि तीन फूट उंचीचं बांधकाम करण्यात आलं आहे. हे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण असून ते त्वरित हटवावं. मात्र मनोरमा खेडकर यांच्यासह कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या नोटिशीला जुमानलं नाही. परिणामी आज महापालिकेला कारवाई करावी लागली. त्यावेळी खेडकर कुटुंबाने काही अतिक्रमण हटवलं.

प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर file photo

बनावट अपंगत्व प्रमाणपत्रासाठी वापरले बनावट रेशन कार्ड

पूजा खेडकर यांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरी बळकावल्याच्या आरोपांनंतर आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी खोटा पत्ता व बनावट रेशन कार्ड वापरून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवलं होतं, असं वृत्त इंडिया टुडेने प्रसिद्ध केलं आहे. पूजा खेडकर यांनी यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये प्लॉट नंबर ५३, देहू आळंदी, तळवडे हा पत्ता सादर केला असून त्यांचं निवासस्थान पिंपरी चिंचवडमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र या पत्त्यावर निवासी मालमत्ता नसून थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिडेट कंपनी आहे. ही कंपनी आता बंद झाली आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar : “हेलिकॉप्टर ढगात गेलं अन् पोटात गोळा आला”, अजित पवारांनी सांगितला गमतीशीर किस्सा; म्हणाले, “फडणवीस मला सहा अपघातांबद्दल…”

पूजा खेडकर यांनी या कंपनीच्या पत्त्याचा वापर करून बनावट रेशनकार्ड तयार करून घेतलं होतं हे कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर स्पष्ट झालं आहे. याच पत्त्याचा वापर करून त्यांनी लोकोमोटर अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. २४ ऑगस्ट २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात त्यांना गुडघ्यात सात टक्के अपंगत्व असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.