प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्याकडे लाचेची मागणी करीत मानसिक त्रास देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील दोन प्रशिक्षक पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक वर्षे दंडाची शिक्षा सुनावली. ४ सप्टेंबर २०१२ रोजी शिवाजीनगर मुख्यालयात ही घटना घडली होती.
नानासाहेब भीमराव साळुंखे (वय ४५) आणि रामचंद्र तात्याबा घुले (वय ५६, रा. खडक पोलीस वसाहत) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत देविदास सूर्यभान पुंजरवाड या प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्याचा भाऊ शिवशंकर सूर्यभान पुंजरवाड यांनी फिर्याद दिली होती. या खटल्यात सरकारी वकील आसिफ बासीत यांनी १८ साक्षीदार तपासले.
देविदास हा पुणे शहर पोलीस दलास भरती झाला होता. त्याचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय या ठिकाणी प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षण काळात सराव करताना कष्ट सहन न झाल्यामुळे देविदास प्रशिक्षणातून पळून गेला होता. देविदासच्या वडिलांनी त्याला पुन्हा प्रशिक्षणासाठी आणून सोडले होते. त्यावेळी संबंधित पोलीस निरीक्षकांनी त्याला पुन्हा प्रशिक्षणासाठी हजर करून घेतले. मात्र, प्रशिक्षण देणारे साळुंखे व घुले यांनी पुन्हा प्रशिक्षणासाठी हजर करून घेण्यास पाच व दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, देविदास याने पैसे न दिल्यामुळे त्याला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून त्याने ४ सप्टेंबर २०१२ रोजी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील एका झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. साळुंखे व घुले यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे एसएमएस दहा मित्रांना पाठविले होते. तसेच, आत्महत्या करताना घातलेल्या वर्दीवरही त्याने त्यांची नावे लिहून ठेवली होती. याप्रकरणी न्यायालयाने दोघांना दोषी धरत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.