पुणे : पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच ४८) नवले पुल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची घटना गुरावारी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास घडली. आंबेगाव येथील उतारावरून मालवाहू कंटेनरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चार ते पाच खासगी वाहनांना धडक दिली. अपघातात कंटेनर चालकासह तीन ते चार व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातामुळे नवले पुलावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली असल्याने महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघाती वाहनांमध्ये अडकून पडलेल्या जखमी नागरिकांची सुटका केली. तसेच अपघातग्रस्त वाहने आणि कंटेनर रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शरद जीने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कात्रजकडे येणाऱ्या मालवाहू कंटेनरनर (एमएच ०४ जेयू ८१८४) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जांभुळवाडी दरीपूल ते नवीन कात्रज बोगदा मार्गावरुन जात असताना उतारावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे पुढे असलेल्या चार ते पाच खासगी प्रवासी वाहनांना जोरदार धडक देत पुढे मार्गस्थ होऊन कंटेनर उलटून पडला.

या अपघातात कंटेनरचालक गंभीर जखमी झाला. तसेच धडक दिलेल्या वाहनांमध्ये अनेक प्रवासी, चालक अडकून पडल्याने तातडीने स्थानिक नागरिक, आपत्ती विभागाच्या पथकाला पाचारन करून या प्रवाशांची सुटका करण्यात आली. कंटेनर चालकासह तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले असून इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.’आंबेगाव पोलीस ठाण्यात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अपघाताबाबतची कारणे शोधण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे जीने यांनी सांगितले.

कोंडी आणि सुटका

नवले पुलावर झालेल्या अपघातामुळे स्थानिक परिसरात पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली असून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूकही मंदावली. सुमारे अर्धातास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. महामार्ग पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली असली. मात्र, प्रवाशांमध्ये पु्न्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत कायम तोडगा काढण्याबाबत मागणी केली जात आहे.