पिंपरी : पुनावळे परिसरात धुळीचे साम्राज्य असल्याने नागरिकांना त्रास होत असून, परिसरातील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित पाण्याची फवारणी करण्याचे आदेश महापौर रवी लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

पुनावळे परिसर नव्याने विकसित होत आहे. या भागात रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पदेखील आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरत असल्याच्या तक्रारी महापौर लांडगे यांच्याकडे आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, लांडगे यांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुनावळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परिसराची पाहणी केली. नगरसेवक कुणाल वाव्हळकर, नगरसेविका रेश्मा भुजबळ, महापालिकेचे सह शहर अभियंता सुनील भागवानी, कार्यकारी अभियंता सोहन निकम, योगेश आल्हाट, सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, शांताराम माने या वेळी उपस्थित होते.

पुनावळे परिसरात गेल्या काही वर्षांत वेगाने नागरीकरण झाले आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. चौक परिसरात सुरू असलेली विविध कामे, वाहनांची मोठी वर्दळ आणि रस्त्यावरील धुळीमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पाहणीवेळी महापौरांकडे केल्या. त्यावर, ‘धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित पाण्याची फवारणी करावी, रस्त्यांची स्वच्छता राखणे, तसेच वाहतूक व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात,’ अशी सूचना महापौर लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा

‘वाहतूककोंडी कमी करण्यासाठी वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) व्यवस्थेचे योग्य नियोजन, पर्यायी मार्गांचा वापर अशा उपाययोजनांसाठी महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येईल,’ असेही महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.