पिंपरी : दाेन काेटी रूपयांची खंडणी न दिल्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पुनावळेतील एका नामांकित फर्निचर मॉलवर अंदाधुंद गोळीबार केला. सहा गोळ्या झाडल्या. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, लाॅरेन्स बिश्नाेई गॅंगने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याची कथित पोस्ट समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ३४ वर्षीय व्यावसायिकाने रावेत पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरून आलेले दोघे आणि खंडणी मागणाऱ्या माेबाइलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रावेत ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी माहिती दिली. फिर्यादीचा भागीदारीत रावेत-ताथवडे बीआरटी मार्गावर फर्निचर मॉल आहे. त्यांच्या भागीदाराकडे भ्रमणध्वनीवरून दोन काेटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.
खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यास त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. फिर्यादी शुक्रवारी रात्री माॅलच्या बाहेर बसले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या आणि फर्निचर मॉलच्या दिशेने पिस्तूलातून सहा गोळ्या झाडल्या. या गोळ्या दुकानाचा नामफलक आणि समोरील काचेवर लागल्या. यात काचा फुटून तुकडे झाले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर तातडीने घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे, प्रवीण मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. माॅलचा परिसर लाखबंद (सील) केला असून फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा केले आहेत. गुन्ह्याच्या तपासाकरिता रावेत पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके रवाना झाली आहेत. सहायक निरीक्षक राहुल कुंभार याबाबत अधिक तपास करीत आहेत.
या गोळीबाराचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याला पाठबळ देणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप आम्हाला मिळाला नाही. त्यादृष्टीने तपास केला जात आहे. दहा पथके या प्रकरणाचा तपास करीत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी सांगितले.
