पिंपरी : रावेत येथील एका फर्निचर मॉलवर गोळीबार केल्याप्रकरणी आरजू बिष्णोई आणि कुलदीप कशिश गॅंगच्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने उत्तराखंड येथून अटक केली. प्रवीण राम निवास (वय २३, बेरी, झज्जर, हरियाणा), पंकज कुलदीप राठी (वय २१, काकराना, रोहतक, हरियाणा), सागर अजय पाल (वय २१, सोनपत, हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील एका नामांकित फर्निचर मॉलवर १५ मे रोजी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. आरोपींनी आठ गोळ्या झाडल्या होत्या. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हा गोळीबार केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपींचा इंदोर, चंदीगड, रोहतक, हरिद्वार असा पाठलाग केला. उत्तराखंड येथे एका लॉजमध्ये आरोपी लपून बसले असल्याची माहिती मिळाली असता गुंडा विरोधी पथकाने तिघांना सापळा लावून अटक केली. बुधवारी (२० मे) रात्री उशिरा त्यांना पुणे येथे विमानाने आणण्यात आले.