पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया.., पुढच्या वर्षी लवकर या…’, असा जयघोष करून दीड दिवसांच्या लाडक्या बाप्पाला पुणेकरांनी निरोप दिला. गणरायाला निरोप देण्यासाठी सायंकाळनंतर विसर्जन घाटांवर नागरिकांनी गर्दी केली.
विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी नदीमध्ये विसर्जन न करता महापालिकेने उभारलेल्या विसर्जन घाटांवर तयार केलेल्या कृत्रिम हौद, लोखंडी टाक्यांना प्राधान्य दिले. तर, महापालिकेने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रांनाही पसंती दिली.
महापालिकेने शहरातील विविध भागांमध्ये उभारलेल्या विसर्जन घाटांवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत अडीच हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तर, साडेतीन हजार किलो निर्माल्य जमा झाले. लोखंडी टाक्यांमध्ये १५०० पेक्षा अधिक मूर्तींचे विसर्जन झाले. महापालिकेच्या हौदांमध्ये ४०० मूर्तींचे विसर्जन झाले. तर ६०० पेक्षा अधिक मूर्तींचे संकलन करण्यात आले.
विसर्जनासाठी घाटांवर आलेल्या कुटुंबांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी होती. गणरायावर पुष्पवृष्टी करताना बालगोपाळांचा आनंद ओसंडून वाहत होता. ‘पुढच्या वर्षी पुन्हा या’ अशी प्रार्थना सर्व जण करीत होते. अनेक कुटुंबांनी पर्यावरणपूरक विसर्जनाचा मार्ग स्वीकारून महापालिकेच्या कृत्रिम हौदांचा वापर केला, अशी माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली.
नगर रस्ता-वाघोली भागात सर्वाधिक मूर्ती संकलित
नगर रस्ता-वाघोली भागात सर्वाधिक ९०२ मूर्ती संकलित करण्यात आल्या. या भागात ५४७ मूर्ती बांधलेल्या हौदांत, तर ३५५ मूर्ती लोखंडी टाक्यांत विसर्जित झाल्या. सिंहगड रस्ता परिसरात ३१५, धनकवडी-कात्रज-आंबेगावमध्ये ४३०, कोंढवा-उंड्रीत २५५, हडपसर-मांजरीत २३८, बिबवेवाडीत ११४ आणि कसबा पेठेत ८४ मूर्तींचे विसर्जन झाले.
घाटांवर विशेष सुरक्षा व्यवस्था
विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी महापालिकेच्या वतीने घेण्यात आली. घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. महापालिकेने तयार केलेल्या हौदांमध्येच ‘श्रीं’च्या मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
– एकूण गणेशमूर्ती : २,४३३
– बांधलेल्या हौदात विसर्जन : ३८२
– लोखंडी टाक्यांत विसर्जन : १,४७५
– महापालिकेकडे संकलित मूर्ती : ५७६
– जमा निर्माल्य : ३,३२८ किलो
– सर्वाधिक मूर्ती : नगर रस्ता – वाघोली – ९०२
– धनकवडी-कात्रज-आंबेगाव : ४३०
– कोंढवा-उंड्री : २५५
– सिंहगड रस्ता : ३१५
– हडपसर-मांजरी : १९०
– बिबवेवाडी : ११४ – कसबा पेठ : ८४
