पुणे : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशांसाठी कनिष्ठ महाविद्यालये, प्रवेशासाठीच्या जागांमध्ये यंदा घट झाली आहे. मात्र, विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत उपलब्ध जागा जास्त असल्याने जागा कमी होण्याचा प्रवेशांवर परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

गेल्या वर्षी राज्यात प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख ४३ हजारांहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. तर, यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ९ हजार २६३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २० लाख ६९ हजार ९४६ जागा उपलब्ध असल्याची आकडेवारी संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १७२ कनिष्ठ महाविद्यालये, तसेच सुमारे ७५ हजारांहून अधिक जागा घटल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील उपलब्ध जागांपैकी १६ लाख १० हजार २९३ जागा केंद्रिभूत प्रवेशांसाठी, तर ४ लाख ९५ हजार ६५३ जागा कोट्यांतर्गत प्रवेशासाठी असल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात नियमित, खासगी, पुन:परीक्षार्थी मिळून १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याशिवाय ४१ हजार ६४ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळालेली आहे. सीबीएसई, आयसीईएसईचे विद्यार्थी आणि पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळूनही अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही अकरावीच्या पाच लाखांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या.

३६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत शून्य फेरीअंतर्गत प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. त्यात आतापर्यंत ३६ हजार २६४ विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत प्रवेश निश्चित केल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत कनिष्ठ महाविद्यालये, प्रवेशासाठीच्या जागांंमध्ये घट झाली आहे. काही कनिष्ठ महाविद्यालये बंद झाली, तर गेल्या वर्षी शून्य प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. – डॉ. महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक

अकरावीच्या जागांचा विचार करता मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रवेश मिळण्याला अडचण नाही. मात्र, काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी, तर काही महाविद्यालये रिकामी अशी विसंगती दिसते. ही विसंगती तातडीने दूर करण्याची गरज आहे. – डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड