पुणे: लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या जल्लोषात आगमन झाले असून, पुण्यातील गणेशभक्तांची कल्पकता पुन्हा एकदा चर्चेत आली. फर्ग्युसन रस्त्यावरील ‘गणेश भेळ’ने पाणीपुरीच्या तब्बल २१ हजार पुऱ्यांचा वापर करून १३ फूट उंच आणि ११ फूट रुंद अशा भव्य, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तीचे अनावरण आज, दुपारी गणेश भेळचे संस्थापक रमेश गुडमेवार, संचालक रुपेश गुडमेवार आणि दिनेश गुडमेवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
आज दुपारी ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहात एका अनोख्या व भव्य गणपती मूर्तीचे अनावरण करण्यात आले. सलग चौथ्या वर्षी ही कल्पकता जपली असून, यापूर्वी गणेश भेळ नमकीन आणि अमेरिकन पुरीचा वापर करून मूर्ती साकारल्यानंतर यंदा त्यांनी ‘पाणीपुरीची संकल्पना’ सादर करत यातून गणरायाला आकार दिला.
कलाकार प्रशांत साळुंखे यांच्या कलाकुसरीतून आणि ११ कामगारांच्या सहकार्याने तब्बल दोन महिने यावर विविध प्रयोग व रंगीत तालीम करून हा गणपती साकारण्यात आला. या गणपतीसाठी बांबू आणि पेपरचा वापर करण्यात आला. हा पाणीपुरीचा गणपती पुढील १२ दिवस सुरक्षित व आहे असाच राहावा यासाठी त्यावर विशेष रासायनिक प्रक्रिया करण्यात आली असून, हॅलोजनच्या साहाय्याने या पुऱ्या टिकवून ठेवल्या जातील. १२ दिवसांनंतर या पुऱ्यांची विल्हेवाट लावून त्या नष्ट केल्या जातील, अशी माहिती दिनेश गुडमेवार यांनी दिली.
आमच्या दुकानाचे नावच गणपतीच्या नावाने सुरू होते. आपल्या लाडक्या गणरायासाठी काहीतरी वेगळे करावे या भावनेतून गेली चार वर्ष भेळीच्या साहित्यातून गणरायाची मूर्ती साकारली जात आहे. यंदा पाणीपुरीची संकल्पना राबवली आहे. अशी माहिती गणेश भेळचे संचालक रुपेश गुडमेवार यांनी दिली.
