पुणे : कामाच्या बदलत्या वेळा, अनिश्चित दैनंदिन वेळापत्रक, व्यवसायाच्या वाढत्या गरजा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, प्रवासासाठीच्या मर्यादा आणि त्यात भर म्हणून व्यायामशाळेच्या ठरलेल्या वेळांमुळे व्यायामाची आवड असूनही अनेकांना व्यायामशाळेत सवडीने जाता येत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी पुण्यात २४ तास सुरू राहणाऱ्या व्यायामशाळेचा प्रयोग करण्यात आला आहे.

टंगस्टन फिटनेस क्लबने पुण्यातील वानवडीत २४ तास सुरू असलेली व्यायामशाळा सुरू केली आहे. नोकरदारांना व्यायामशाळेच्या वेळांनुसार आपले वेळापत्रक बदलण्याची वेळ येऊ नये, प्रत्येकाला आपापल्या सोईने व्यायाम करता यावा, या उद्देशाने ही व्यायामशाळा सुरू करण्यात आल्याचे क्लबचे संस्थापक विशाल नरेंद्र मंगल यांनी सांगितले. या व्यायामशाळेला २२ ते ४० वयोगटातील नोकरदारांकडून अधिक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘व्यायाम नियमित असेल, तरच त्याचा परिणाम दिसतो. त्यासाठी प्रत्येकाला सोईनुसार व्यायामशाळेत जाता आले पाहिजे. मात्र, व्यायामशाळांच्या वेळा ठरलेल्या असतात. अनेकांना याच वेळेत व्यायाम करणे शक्य होत नाही,’ असे सांगून विशाल यांनी व्यायामशाळा सुरू करण्यामागच्या उद्देशावर भाष्य केले.

ते म्हणाले, ‘पुण्यात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी, उद्योजक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. नोकरीवर करावी लागणारी रात्रपाळी, कामाचा वाढता व्याप आणि प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेमुळे अनेकांना नियमित वेळेत व्यायामशाळेत जाणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींना त्यांच्या सोईनुसार व्यायाम करता यावा, यासाठी चोवीस तास सुरू असलेली व्यायमशाळा सुरू करण्याचे ठरवले.’

‘पुरेशा विश्रांतीचा सल्ला’

‘रात्री उशिरा किंवा भल्या पहाटे व्यायाम करणे, हे व्यायामशाळांच्या पारंपरिक ठरलेल्या वेळांमधील व्यायामाइतकेच फायद्याचे असते. मात्र, रात्री व्यायाम करताना झोपेचा समतोल राखणे महत्त्वाचे असते. झोपण्यापूर्वी अतिशय तीव्र व्यायाम करणे टाळावे आणि व्यायामानंतर पुरेशी विश्रांती घ्यावी, असा सल्ला या २४ तास सुरू राहणाऱ्या व्यायामशाळेतील सदस्यांना देत असतो,’ अशी माहिती विशाल नरेंद्र मंगल यांनी दिली. ‘या व्यायामशाळेत रात्री उशिरा व भल्या पहाटे येणाऱ्या सदस्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी नियंत्रित प्रवेशव्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि सदस्यांच्या गरजेनुसार मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.