पुणे : अवयवदान चळवळीत एक ऐतिहासिक नोंद झाली असून, अवघ्या तीन वर्षांच्या बालकाच्या अवयवदानामुळे दोन बालकांना नवे जीवन आणि दोन नेत्रहीनांना दृष्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हे बाल अवयवदान पार पडले.

ताडीवाला रस्त्यावरील एका कुटुंबातील तीन वर्षांचा मुलगा दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. २ जून रोजी त्याला रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभाग आणि डॉ. संजय व्होरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १२ जून रोजी त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले. मेंदूमृत असल्याचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाचे अधिकारी डॉ. देविदास भालेराव यांनी दिले.

दुःखाच्या छायेत असतानाही मुलाच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत प्रत्यारोपण समन्वयक लोचना जाधव यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन केले.

विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या माध्यमातून मुलाचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे गरजू बालरुग्णांना देण्यात आली. यकृत आणि एक मूत्रपिंड रुबी हॉल क्लिनिकमध्ये, तर दुसरे मूत्रपिंड बाणेर येथील मणिपाल रुग्णालयातील बालरुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. तसेच, लहान मुलाच्या दोन्ही नेत्रांचेही दान करण्यात आले असून, त्याद्वारे कॉर्निया ब्लाइंड गटातील दोन रुग्णांना दृष्टी मिळणार आहे. सर्व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

या अवयवदानाबद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. विवेक लाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बाल अतिदक्षता विभाग, प्रत्यारोपण पथक आणि परिचारिका कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, मुलाच्या पालकांच्या धैर्याचे विशेष कौतुक केले.
या वेळी रुग्णालय प्रशासनाने सांगितले, की अवघ्या तीन वर्षांच्या बालकाकडून अवयवदान होणे अत्यंत दुर्मीळ आहे. मुलाच्या पालकांनी अत्यंत कठीण प्रसंगी घेतलेल्या निर्णयामुळे दोन मुलांना नवजीवन आणि दोन जणांना दृष्टी मिळणार आहे. पुणे विभागासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे.