पुणे : शाळेत मस्ती करणाऱ्या तीन वर्षांच्या बालकाला स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी मुंढवा पोलिसांकडून बी. टी. कवडे रस्त्यावरील एका नामवंत इंग्रजी शाळेतील शिक्षिकेसह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या बाबत मुलाच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ८ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकरा ते दुपारी सव्वादोन या वेळेत तीन वर्षांच्या मुलाला स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याचे मुलाच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३६ वर्षीय महिला एका नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांचा तीन वर्षे वयाचा मुलगा बी. टी. कवडे रस्त्यावरील एका शाळेत आहे. ८ सप्टेंबर रोजी दुपारी त्या मुलाला घेण्यासाठी शाळेत गेल्या. तेव्हा मुलगा रडत होता. शिक्षिकेला त्या बाबत विचारले असता त्यांनी मुलाने मस्ती केल्याने त्याला शाळेतील खोलीत डांबून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेने मुलाला विचारले. तेव्हा शिक्षिकेने स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याचे त्याने सांगितले. शिक्षिकेला पुन्हा या बाबत विचारले असता त्यांनी स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याचे मान्य केले. ‘मुलगा खूप मस्ती करत होता. शाळेत जागा उपलब्ध नसल्याने त्याला स्वच्छतागृहात डांबून ठेवले,’ असे शिक्षिकेने सांगितले.

या घटनेची शहानिशा करण्यासाठी महिलेने शाळेच्या व्यवस्थापनाकडे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली. व्यवस्थापनाने सुरुवातीला टाळाटाळ केली. महिलेने पाठपुरावा केल्यानंतर २१ सप्टेंबर रोजी सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध करून देण्यात आले. त्यात मुलाला स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याचे दिसले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने या सीसीटीव्ही चित्रीकरणाची चित्रफीत मागितली, तेव्हा तांत्रिक कारण सांगून ती उपलब्ध करून देण्यात आली नाही. महिलेच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.