पुणे : नवउद्योजकांना उद्योग उभारताना अनेक अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यावर उपाय म्हणून पुण्यातील उद्योजकांनी एकत्र येऊन ४११ फाउंडर्स क्लबची स्थापना केली आहे. या माध्यमातून उद्योजकांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण आणि मुक्त संवाद घडवून आणला जात आहे. आतापर्यंत सात हजारांहून अधिक उद्योजकांनी या मंचावर नोंदणी केली आहे.
देवयानी पवार आणि पवन रोचवानी यांनी ४११ फाउंडर्स क्लबची स्थापना केली आहे. पारंपरिक नेटवर्किंगच्या पलीकडे जाऊन उद्योग उभारताना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी, निर्णय, अपयश आणि त्यातून मिळालेले धडे यावर अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या समुदायात प्रारंभिक टप्प्यातील नवउद्यमी (स्टार्ट अप), वाढीच्या टप्प्यातील उद्योजक, पारंपरिक उद्योगांचे प्रतिनिधी, दुसऱ्या पिढीतील उद्योजक, गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. कृत्रिम प्रज्ञा (एआय), माहिती-तंत्रज्ञान, वित्त तंत्रज्ञान, शिक्षण तंत्रज्ञान, निर्मिती क्षेत्र, आरोग्यसेवा, कृषी तंत्रज्ञान, हवामान, स्थावर मालमत्ता, माध्यमे, विपणन, कंटेंट क्रिएशन अशा विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व आहे.
गेल्या सहा महिन्यांत ‘चितळे बंधू’चे इंद्रनील चितळे, ‘कायनेटिक’च्या आरझू अलीम फिरोदिया, ‘कूल द ग्लोब’च्या प्राची शेवगावकर, ‘उगाओ’चे सिद्धान्त भालिंगे, ‘हाऊस ऑफ आद्या’च्या सायली मराठे, ‘अटेन्क्स जीम’चे आदित्य गणेशवाडे, ‘सॉलिटेरिओ डायमंड्स’चे कबीर काटे, ‘अमुक तमुक’चे ओंकार जाधव, ‘केक डिओर’च्या हर्षिता शोरवाला आणि ‘ले प्लाझिर’चे सिद्धार्थ महाडिक यांच्यासह अनेक उद्योजकांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
उपक्रमाच्या पुढील टप्प्यात ‘फाउंडर्स लॅब’ आणि ‘लेगसी टेबल’ हे दोन नवे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. ‘फाउंडर्स लॅब’अंतर्गत यशस्वी कंपन्यांच्या उभारणीमागील निर्णय, आव्हाने, कार्यसंस्कृती आणि संस्थापकांचा प्रवास उलगडला जाणार आहे. ‘लेगसी टेबल’ या उपक्रमातून भारतातील नामांकित उद्योग घराण्यांच्या दोन-तीन पिढ्यांमध्ये उद्योजकता, नेतृत्व, उत्तराधिकार, नवकल्पना आणि कौटुंबिक मूल्यांवर मुक्त चर्चा घडवून आणली जाणार आहे.
मनमोकळा संवाद
उद्योजकांना भेटीगाठींसाठी अनेक मंच उपलब्ध असले, तरी व्यवसाय उभारताना येणाऱ्या खऱ्या आव्हानांवर मनमोकळा संवाद साधण्याची संधी फार कमी मिळते. गेल्या सहा महिन्यांत हजारो उद्योजकांनी नोंदणी करून या समुदायाचा भाग बनण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजकीय अनुभव आणि ज्ञान अधिकाधिक इच्छुक उद्योजकांपर्यंत पोहोचविणे, यशस्वी उद्योगांमागील विचारप्रक्रिया, मूल्यव्यवस्था आणि कार्यपद्धती यांचे दस्तावेजीकरण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे, असे क्लबच्या सह-संस्थापक देवयानी पवार यांनी सांगितले.
