पुणे : गुंतवणूकदारांची ८८ कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पसार झालेल्या महिला आरोपीचे प्रत्यार्पण करण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरोपी उतरल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीबीआय) तिला ताब्यात घेतले. महिला, तसेच तिच्या पतीविरुद्ध पुणे पोलिसांनी फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी दाम्पत्य परदेशात पसार झाले होते. तिच्या पतीचे नुकतेच प्रत्यार्पण करण्यात आले होते.

विशाखा अविनाश राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या आठवड्यात तिचा पती अविनाश अर्जुन राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत) याचे संयुक्त अरब अमिरातीतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. बाणेर परिसरात अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा यांनी एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी ही कंपनी सुरू केली होती. या दाम्पत्याने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी सुरुवातीला गुंतवणूकदारांना परतावा दिला. नंतर मात्र परतावा देण्याचे थांबविले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात २० एप्रिल २०२३ रोजी तक्रार दिली. त्यावरून राठोड दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर हे दाम्पत्य पसार झाले. ते निदर्शनास आल्यानंतर आर्थिक गु्न्हे शाखेने न्यायालयात दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. राठोड दाम्पत्य परदेशात पसार होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी रेड काॅर्नर नोटीस बजाविली. विशेष न्यायालयात राठोड दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. राठोड दाम्पत्य परदेशात पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती.

‘सीबीआयने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून अविनाश आणि त्याची पत्नी विशाखा यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गेल्या आठवड्यात अविनाशचे प्रत्यार्पण करण्यात आले. मुंबई विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची पत्नी विशाखा हिचे प्रत्यार्पण करण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (३ ऑगस्ट) तिला ताब्यात घेण्यात आले आणि पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले,’ अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली.