पुणे : मोटारीच्या धडकेत बैलाचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार संजय मोरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी मोटार बाॅम्बे इंजिनिअरिंग ग्रुपसमोरून लोहगाव विमानतळाकडे सोमवारी दुपारी निघाली होती. भरधाव मोटारीने रस्त्याने निघालेल्या बैलाला धडक दिली. मोटारीने धडक दिल्याने बैलाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या बैलाला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. भरधाव मोटार चालवून बैलाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार माचरे तपास करत आहेत.