पुणे : सदाशिव पेठेतील निलया इन्स्टिट्यूट या खासगी संस्थेत मध्यरात्री आग लागली. संस्थेच्या आवारातील कार्यालयात झाेपलेल्या वसतिगृह व्यवस्थापकाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. वसतिगृहातील ४० विद्यार्थिनींंची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केल्याने गंभीर दुर्घटना टळली.

सदाशिव पेठेतील बॅ. गाडगीळ रस्त्यावर निलया इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेकडून वाणिज्य विषयक अभ्यासक्रम चालविले जातात. संस्थेची तीन मजली इमारत असून, तेथे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास संस्थेत आग लागली. आग भडकल्याने त्याची झळ वसतिगृहातील खोल्यांपर्यंत पोहाेचली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब, टँकर, रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा सुरू केला. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा – ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दडपशाही करणाऱ्यांना नाकारले! सुप्रिया सुळे यांचा आरोप

वसतिगृहातील ४० ते ४२ विद्यार्थिनींना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. संस्थेच्या कार्यालयात वसतिगृह व्यवस्थापक राहुल कुलकर्णी झोपले होते. त्यांना खोलीतून बाहेर पडता आले नाही. होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी दिली.

वसतिगृहातील विद्यार्थीनींमध्ये घबराट

आग लागल्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थिनी घाबरल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुखरुप सुटका केल्याने गंभीर दुर्घटना टळली. आगीत वसतिगृहात ठेवलेले शैक्षणिक साहित्य जळाले. त्यावेळी विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले.

हेही वाचा – धक्कादायक! कसब्यात घटस्फोटीत महिलेच्या दुसऱ्या पतीचा कोयत्याने वार करून खून; गुंड राजा मारटकरच्या मुलासह साथीदारावर गुन्हा

सदाशिव पेठेतील गाडगीळ रस्त्यावर निलया इन्स्टिट्यूटचे कार्यालय आहे. मध्यरात्री संस्थेत आग लागली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. दुर्घटनेनंतर महावितरणच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी भेट दिली आहे. महावितरणच्या अहवालानंतर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. – दीपाली भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे</p>