छळामुळे विवाहित तरुणीने इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना हडपसरमधील हांडेवाडी भागात घडली. या प्रकरणी पतीसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्या तरुण कानडे (वय २४, रा. नवरत्न एक्झोटिका सोसायटी, हांडेवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पती तरुण कानडे (वय ३०), सासरे मदन, सासू सपना, दीर अरुण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिव्याचे वडील शामराव आनंदा बनसोडे (वय ५०,रा. घानेगाव, ता. गंगापूर, जि. ओैरंगाबाद) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मागील वर्षीच दिव्याचा विवाह झाला होता. दिव्या उच्चशिक्षित होती. मात्र विवाहात मानपान केला नाही तसेच हुंडा कमी दिला, या कारणावरुन तिचा छळ सुरु करण्यात आला. तिला टोमणे मारण्यात आले. छळामुळे तिने इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली. दिव्या गर्भवती होती, अशी देखील माहिती तिचे वडील शामराव बनसोडे यांनी फिर्यादीत दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत.