पुणे : पाण्याच्या टाकीत बुडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना वाघोली परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रेखा मुकेशसिंग चौहान (वय ६) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी रमेश बालाजी मुंडे (वय ४०, रा. कवडे वस्ती, वाघोली ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुकेशसिंग चौहान (वय २९, रा. खांदवेनगर, वाघोली) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – पुण्यात गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचाच ‘आव्वाज’! कमाल मर्यादा पातळीचा सर्वत्र भंग; दोनशे मंडळांच्या ठिकाणी तपासणी

हेही वाचा – पुणे: शहरातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद, मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

वाघोलीतील कवडे वस्ती परिसरात मुंडे याची तीन मजली इमारत आहे. इमारतीचे बांधकाम अर्धवट झाले आहे. तेथे असलेल्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही. सुरक्षेच्या दृष्टीने पाण्याच्या टाकीला झाकण बसणे गरजेचे होते. मुकेशसिंग याची सहा वर्षांची मुलगी रेखा अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीतील टाकीजवळ गेली. टाकीत ती तोल जाऊन पडल्याची घटना शनिवारी घडली. टाकीत बुडालेली रेखा घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. तेव्हा ती टाकीत बुडाल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. इमारत मालक मुंडे याच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर मुंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक खटके तपास करत आहेत.