पुणे : भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार हाॅटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर शनिवारी घडली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी टँकर चालकाला अटक केली.
अनिल सीताराम आल्हाट (वय ४७, रा. भिमाले काॅम्प्लेक्स, मार्केट यार्ड) असे मृत्युमुखी पडलेल्या हाॅटेल व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी टँकर चालक निलेश लक्ष्मण पोटे (वय ३६,रा. पवननगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी टँकर मालकाविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत आल्हाट यांचा भाचा महादेव गोरख कांबळे (वय ३७) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आल्हाट हे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बिबवेवाडी-कोंढवा रस्त्याने निघाले होते. कल्याण भेळ दुकानासमोर भरधाव टँकरने दुचाकीस्वार आल्हाट यांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार आल्हाट गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
टँकरची तांत्रिक तपासणी प्रमाणपत्राची (फिटनेस सर्टिफिकेट) मुदत संपली होती. टँकर मालकाने चालकाला टँकर चालविण्यास दिल्याने पोलिसांनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडके आठवडाभरात तिघांचा मृत्यू झाला आहे.
टँकरच्या धडकेत तिघांचा मृत्यू
भरधाव टँकरच्या धडकेत अपघात होण्याच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी टंँकर मालक, चालकांची बैठक कोंढवा पोलीस ठाण्यात नुकतीच घेतली होती. या बैठकीत पोलिसांनी टँकर मालक, चालकांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही शहरात ठँकरचालकाकडून गंभीर स्वरुपाचे अपघात होण्याचे सत्र कायम आहे. वानवडीत पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. महंमदवाडीत टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.त्यानंतर बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार हाॅटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२५ एप्रिल) घडली.
दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू
भरधाव दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव भागात नुकतीच घडली. ज्ञानेश्वर दिलीप रोटे (वय ४०, रा. रोटेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे मृ्त्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत रोटे यांची पत्नी स्वाती (वय ३२) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ज्ञानेश्वर रोटे हे १३ एप्रिल रोजी दुचाकीवरुन दुपारी बाराच्या सुमारास लोहगाव भागातील पोरवाल रस्त्याने निघाले होते. त्या वेळी पार्क स्प्रिंग सोसायटीसमाेर भरधाव दुचाकी घसरली. दुचाकीस्वार रोटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रोटे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणाची नोंद लोहगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करत आहेत.
