पुणे : भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना वानवडीतील गंगा सॅटेलाईट सोसायटीसमोर मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी टँकर चालकाला वानवडी पोलिसांनी अटक केली. ग्रेसिया डॅनिअल इसा (वय २२, रा. नॅन्सी टाॅवर, केदारी पेट्रोल पंपासमोर, वानवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी टँकर चालक संतोषकुमार इंद्रदेवप्रसाद मौर्या (वय ३४, सध्या रा. नेताजीनगर, वानवडी, मूळ रा. रजौली, जि. नवादा, बिहार) याला अटक करण्यात आली.
याबाबत ग्रेसियाची आई गीता (वय ४९) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेसिया ही अभियंता असून, नांदेड सिटी परिसरातील एका खासगी कंपनीत ती कामाला आहे. मंगळवारी तिला सकाळी कामावर लवकर बोलावले होते. त्यामुळे गडबडीत ती घरातून बाहेर पडली. वानवडीतील गंगा सॅटेलाईट सोसायटी रस्त्यावर भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वार ग्रेसियाला धडक दिली.
टँकरच्या चाकाखाली ती सापडली. गंभीर जखमी झालेल्या ग्रेसियाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केली.
दुसऱ्या एका प्रकरणात मद्यधुंद टँकर चालकासह मालकही अटकेत
कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार अरिज शेख (वय १९) याचा ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. अपघात प्रकरणात मद्यधुंद टँकर चालक रवींद्र भीमराव दनाने (वय ३४), तसेच मालक नितीन मधुकर ननावरे (वय ४६, रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली. याबाबत अरिज याचे वडील एजाज शेख यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. टँकर चालक दनाने याला दारूचे व्यसन आहे. तो व्यसनाधीन असल्यचाी माहिती टँकर मालक ननावरे यांना होती. टँकर मालकाचा निष्काळजीपणा हा गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी टँकर मालकाला अटक करण्यात आली.
वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कमल दत्तात्रय भुजबळ (वय ८२, रा. महात्मा फुलेनगर, माळी मळा, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वाहनचालक प्रसन्न प्रकाश अहिरेकर (वय ३५, रा. मोहिते टाऊनशिप, सिंहगड रस्ता ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत भुजबळ यांचा नातू हर्षल (वय २०) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल भुजबळ सोमवारी (६ एप्रिल) सकाळी सातच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी माळी मळा परिसरात भरधाव वाहनाने पादचारी भुजबळ यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक बोराटे तपास करत आहेत.
