पुणे : नेहमीप्रमाणे कामानिमित्त दुपारी दुचाकीवरून एक तरुण जात होता. वासुली फाट्यावर अचानक एक भरधाव मोटार त्याच्या दिशेने आली. काही कळण्याआधीच मोटारीने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो दुचाकीवरून उडून थेट शेजारील नाल्यात पडला. बघ्यांची गर्दी जमली आणि त्यातील काहींनी त्याला बाहेर काढले. त्यावेळी सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. कारण एक लोखंडी सळई त्याच्या शरीरात आरपार घुसली होती. तिथून सुरु झाला त्याला वाचविण्याचा प्रवास…
वासुली फाटा येथे १३ मार्चला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास २१ वर्षीय तरुण दुचाकीवर जात होता. त्यावेळी भरधाव आलेल्या मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात हा तरुण रस्त्याशेजारील गटारात पडला. त्या वेळी गटारातील एक लोखंडी सळई त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीत घुसली. त्याला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे या तरुणाच्या पायातील सळई काढणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससूनमध्ये केलेल्या तपासणीत सळई तरुणाच्या उजव्या पायाच्या मध्य भागातून आत शिरून गुडघ्याच्या खालच्या बाजूने बाहेर आल्याचे निदर्शनास आले.
ससूनमधील डॉक्टरांनी या तरुणाची तातडीने ‘एव्ही डॉप्लर’ चाचणी केली. या चाचणीत रुग्णाच्या शरीरातील रक्तवाहिन्या आणि त्यातून होणाऱ्या रक्तप्रवाहाची स्थिती तपासण्यात येते. या चाचणीतून रक्तप्रवाहात कोणताही अडथळा निर्माण झाला नसल्याचे निष्पन्न झाले. या जखमेमुळे पायाच्या मुख्य रक्तवाहिन्या, हाडे अथवा मज्जातंतूंना इजा झाली नव्हती. त्यानंतर या तरुणाला तत्काळ धनुर्वाताची लस देण्यात आली. या तरुणाला ‘स्पाइनल ॲनेस्थेशिया’ पद्धतीने भूल देऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात डॉक्टरांनी तरुणाच्या पायातून लोखंडी सळई बाहेर काढली.
शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती आता सुधारली आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सहयोगी प्राध्यापक डॉ. किरणकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहायक प्राध्यापक डॉ. प्रियांका साळुंखे, निवासी डॉक्टर डॉ. कौस्तुभ हिमाल, डॉ. किरण नाग, डॉ. स्निग्धा शेवाळकर यांनी केली. या शस्त्रक्रियेत भूलशास्त्र विभाग आणि शस्त्रक्रिया विभागातील कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
तरुणाच्या पायात सळई आरपार गेली होती. ती काढताना रक्तवाहिन्या आणि चेतापेशींना इजा होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक होते. त्या दृष्टीने शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. तरुणाच्या पायातून शस्त्रक्रियेद्वारे सळई काढण्यात आली असून, त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. – डॉ. किरणकुमार जाधव, सहयोगी प्राध्यापक, ससून सर्वोपचार रुग्णालय
