scorecardresearch

पुणे :सिंहगडावर बसला अपघात; कठड्याला पीएमपी धडकली

सिंहगड किल्ल्यावरून उतरताना घाट रस्त्यातील वळणाचा अंदाज न आल्याने पीएमपी कठड्याला धडकली.

सिंहगड किल्ल्यावरून उतरताना घाट रस्त्यातील वळणाचा अंदाज न आल्याने पीएमपी कठड्याला धडकली. चालकाने वेळीच गाडीवर नियंत्रण ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघात किरकोळ असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी गाडीतील २८ प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला.
या अपघातामुळे पर्यटकांच्या सुविधेसाठी वनविभाग आणि पीएमपी प्रशासनाने सुरू केलेल्या बससेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, बारा मीटर लांबीच्या गाड्यांऐवजी नऊ मीटर लांबीच्या गाड्या का वापरल्या जात नाहीत, अशी विचारणाही पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

सिंहगड किल्ल्यावरून पायथ्याला जाणाऱ्या ई-बस चालकाला उतारावर वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे गाडी कठड्याच्या संरक्षक भिंतीला धडकली. या संरक्षक भिंतीच्या खाली मोठी दरी होती. मात्र चालकाने गाडीवर नियंत्रण मिळविल्याने दुर्घटना टळली. या गाडीत २८ प्रवासी होते. मात्र कोणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमपी आणि वन विभागाच्या वतीने महाराष्ट्र दिनापासून सिंहगडावर वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी वीजेवर धावणाऱ्या गाड्या (इलेक्ट्रीकल बस- ई-बस) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सिंहगड किल्ल्यावर खासगी वाहने घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी ई-बसचा वापर करावा लागत आहे. सिंहगडावर ई-बसची सुविधा सुरु झाल्यानंतर पर्यटकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी अपुऱ्या गाड्या असल्याने गाड्यांसाठी प्रतिक्षा करावी लागत होती. त्यातच चार्जिंग संपल्याने पर्यटकांना तीन ते चार तास ताटकळत थांबावे लागण्याच्या तसेच वळणावरील चढामुळे प्रवाशांनाही ई-बसला धक्का द्यावा लागत असल्याच्या घटना पुढे आल्या होत्या. त्यातच गाडीचा किरकोळ अपघात झाल्याने या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पीएमपीच्या ताफ्यात नऊ मीटर लांबीच्या ई-बस असताना बारा मीटर लांबीच्या मोठ्या गाड्यांचा वापर का केला जात आहे, असा प्रश्नही पर्यटकांकडून आणि प्रवासी संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune accident sinhagad hit wall pmp administration tourists forest department amy

ताज्या बातम्या