पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागात घडली. सूरज केशव बापमारे (वय २१, रा. वडकी, हडपसर-सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सूरज याचा आतेभाऊ महेश प्रकाशराव आगे (वय २९, रा. वडकी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सोमवारी (५ मे) रात्री अकराच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्याने निघाला होता. वडकी नाला परिसरात तो रस्ता ओलांडत होता. त्या वेळी भरधाव टेम्पोने सूरजला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या सूरजचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.