पुणे : मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज ते नवले पूल या आठ किलोमीटरच्या टप्प्यात प्रशासनाकडून कार्यवाही केल्यानंतर अपघातांची संख्या ६४ टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र, प्राणांतिक अपघातांची तीव्रता कमी होत नसल्याचे गुरुवारी घडलेल्या जीवघेण्या अपघातानंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता आठ किलोमीटर टप्प्यातील तीव्र उतार कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तातडीने (एनएचएआय) शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत.
कात्रज ते नवले पूल मार्गावर अपघातांना प्रतिबंध घाालण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी समिती गठित केली होती. त्यानुसार एनएचएआयने केलेल्या अभ्यासानुसार या ठिकाणी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. अपघात रोखण्यासाठी गरजेनुसार डिजिटल फलक, विविध भाषांमध्ये सूचना फलक, अतिक्रमणे काढून रस्त्याचे रुंदीकरण, जास्त उंचीच्या रम्बल पट्टया, मार्गिका आखणी, आगमन आणि निर्गमन केंद्रे अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या. तसेच नव्हे येथे वेग नियंत्रण कॅमेरे कार्यान्वित करून त्याद्वारे भरधाव वाहनांवर २४ तास कारवाई करण्यात येत आहे.
याशिवाय नवीन कात्रज बोगदा येथे वाहतूक तपासणी नाका चौकी उभारण्यात येऊन तेथे सातारा, मुंबई मार्गिकांसाठी एक गस्त वाहन तैनात असून एक अधिकारी, दोन अंमलदार यांची नेमणूक केली. नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान वेगमर्यादा ताशी ६० कि.मी. वरून ४० कि.मी. करण्यात आली. तसेच नवले पूल ते कटील हॉटेल येथे नवीन हाय मस्ट दिवे बसविण्यात आले आहेत.
त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि वेगमर्यादा राखण्याची प्रवृत्ती दिसून येत नसून, तीव्र उतारामुळे अपघात होत असल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाकडून लावला जात आहे.
चार दिवसापूर्वीच बैठक
रस्ता सुरक्षा उपाययोजनेंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चार दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. या बैठकीत नवले पुलाच्या अपघातासंदर्भात आढावा घेतला होता. यावेळीही तीव्र उतारासंदर्भात काही उपाययोजना करण्याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
कात्रज ते नवले पूल या आठ किलोमीटरच्या टप्प्यातील तीव्र उतार कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
गेल्या तीन वर्षांत अपघातातील घट
वर्ष – अपघात – प्राणांतिक – गंभीर – किरकोळ
२०२२ – २८ – ७ – १० – ५
२०२३ – २५ – ९ – ६ – ४
२०२४ – १० – ४ – ३ – १
