पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील खानावळीत पाण्याच्या फिल्टरजवळ विजेचा धक्का लागल्याने उपचारादरम्यान विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात बुधवारी ठिय्या आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर कृषी महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली असून, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व कृषी महाविद्यालयांच्या आवारात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशामक आणि स्थापत्य लेखापरीक्षण करण्याचा आदेश दिला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी याबाबतची माहिती दिली. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील ॲग्रीकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचा विद्यार्थी चैतन्य चव्हाण याला महाविद्यालयातील विद्यार्थी खानावळीत पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरजवळ १४ मार्च रोजी विजेचा धक्का लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या महाविद्यालयातील त्रुटींबाबत संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालयात बुधवारी ठिय्या आंदोलन केले. कृषी महाविद्यालय हे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असल्याने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी महाविद्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. डॉ. खर्चे यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत ते म्हणाले, ‘घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने काम सुरू केले आहे. समितीचा अहवाल पुढील १५ दिवसांत सादर होईल. त्यानंतर संबंधित प्रकरणातील दोषींवर कारवाई निश्चित केली जाईल. विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशामक आणि स्थापत्य लेखापरीक्षण करण्यात येणार आहे.

विजेचे धक्के २०२३पासून बसत असल्याची तक्रार करत असल्याचे शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडे कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व कृषी महाविद्यालयांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी समितीमध्ये विद्यापीठाच्या अभियंत्यांचाही समावेश आहे. संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्यांमार्फत आर्थिक मदत करण्यासंदर्भातील आदेश कुलसचिवांना दिला आहे, असे कुलगुरू डॉ. खर्चे यांनी सांगितले.