पुणे : शहरात वायू प्रदूषण वाढत असताना शहरातील अनेक बेकरी व्यावसायिक लाकूड, कोळशाचा वापर करत असल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित बेकरी व्यावसायिकांनी लाकूड, कोळशाऐवजी पुढील दहा दिवसांत हरित इंधनाचा वापर सुरू न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने बेकरी व्यावसायिकांना दिला आहे.शहरामध्ये हवेतील प्रदूषणामध्ये वेगवेगळ्या कारणांनी सतत वाढ होत आहे. वाढत असलेल्या प्रदूषणाचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या हद्दीतील बेकऱ्या, रेस्टॉरंट्स, ढाबा या ठिकाणी हरित इंधनाचा वापर सुरू करावा, असे आदेश महामंडळाने दिले आहेत. यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी शहरातील बेकरी व्यावसायिकांची बैठक घेतली. यामध्ये हरित इंधनाचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले.शहर आणि उपनगरांमध्ये बेकऱ्यांची संख्या एक हजारापेक्षा अधिक आहे. बेकरी व्यवसायासाठी आजही मोठ्या प्रमाणावर लाकूड, कोळसा यांचा वापर केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन हवेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे उपायुक्त पवार यांनी बेकरी व्यावसायिकांच्या लक्षात आणून दिले.

काही बेकरी व्यावसायिकांनी हरित इंधनाचा वापर सुरू केला असून, काही जण एलपीजी, पीएनजी, वीज या हरित इंधनाचा वापर करण्याच्या प्रक्रियेत आहेत. मात्र, काही व्यावसायिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. बेकरीचा व्यवसाय करताना व्यावसायिकांनी हरित इंधनाचा वापर करून हवेतील प्रदूषण कमी करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.यावेळी बेकरी व्यावसायिकांनी हरित इंधन वापर करण्यासाठी येणाऱ्या अडचणी पवार यांच्यासमोर मांडल्या. जे व्यावसायिक दहा दिवसांत हरित इंधनाचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर महापालिकेच्या वतीने कडक कारवाई केली जाईल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

वाहनांची वाढणारी संख्या प्रदूषणाचे मुख्य कारण

‎पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वायू प्रदूषणात वाढ होण्याचे एक प्रमुख कारण आहे. जुलै २०२५ पर्यंत पुण्यात एकूण ४१ लाख २५ हजार ९६८ वाहने झाली आहेत. गेल्या वर्षभरात यात सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये ही संख्या ३८ लाख ६३ हजार ८४९ होती. या वाढत्या संख्येत इलेक्ट्रिक वाहने (३३,३८७), सीएनजी वाहने (४३,५३३) आणि हायब्रीड वाहने (५,७८१) यांचा समावेश आहे. मात्र पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या अजूनही सर्वाधिक आहे, ज्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढतच आहे.