पुणे : शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ‘पीएम २.५’ आणि नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढ होत असल्याचे पुणे महापालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालातून समोर आले आहे. शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत चालल्याने विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांची संख्येतही वाढ झाली आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्याही वाढत असून सहा वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. तर शहराची लोकसंख्या ८१ लाख ६४ हजारावर गेल्याचा अंदाज अहवालामध्ये प्रथमच व्यक्त करण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने दर वर्षी शहरातील विविध घटकांवर परिणाम स्पष्ट करणारा पर्यावरणाच्या स्थितीचा अहवाल तयार केला जातो. हा अहवाल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडून त्यावर सविस्तर चर्चा केली जाते. ३१ जुलैपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पर्यावरणाचा अहवाल सादर करणे बंधनकारक असते. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाने चालू वर्षाच्या २०२५-२६ चा पर्यावरणाचा अहवाल सादर केला. यावर पुढील महिन्यात सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे.

महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरणाच्या अहवालामध्ये शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हवेची ढासळणारी गुणवत्ता हा चिंतेचा प्रमुख विषय आहे. ‘पीएम २.५’ आणि नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत हळूहळू वाढ होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या, नदीत सोडले जाणारे दुषित पाणी, वाढणारी बांधकामे, वाढते औद्योगिकीकरण यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.

वाढणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यावसायिक आस्थापनांना स्वच्छ इंधनाचा वापर बंधनकारक करणे, उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घालणे आणि मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर सेन्सरआधारित धूळ निरीक्षण यंत्रणा बसवणे असे उपाय केले जात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि विद्युत वाहनांच्या वापरात प्रगती झाल्याचा दावा महापालिकेने पर्यावरण अहवालामध्ये केला आहे.

रस्त्यांचा श्वास कोंडला ! वाहनांची संख्या झाली ‘दुप्पट’

पुणे शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्या प्रमाणात रस्त्यांची क्षमता वाढलेली नाही. त्यामुळे वाहतूककोंडीबरोबरच पादचारी आणि सायकलस्वारांसाठी उपलब्ध जागेवरही मोठा परिणाम होत आहे. गेल्या सहा वर्षांत नव्या वाहननोंदणीची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. २०२०-२१ मध्ये वर्षाला १ लाख ४७ हजार वाहनांची नव्याने नोंद होत होती. तर २०२५-२६ मध्ये ३ लाख ४६ हजारांवर पोहचली आहे.

शहरातील मोजक्याच रस्त्यांवर पदपथ असून स्वतंत्र सायकल मार्गही मर्यादित आहेत. वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, अपुरी पायाभूत सुविधा आणि वाढती वाहतूककोंडी यामुळे सहाजिकच वायुप्रदूषणातही भर पडत आहे. महापालिकेने नागरिकांकडून केलेल्या सर्वेक्षणामध्ये पायी चालणे आणि सायकल वापरण्यासाठी नागरिकांनी पसंती दाखविली आहे. सलग आणि अखंड पदपथांची मागणी ७३ टक्के नागरिकांनी केली आहे. सुरक्षित रस्ते, वाहतूककोंडी कमी करणे आणि स्वतंत्र सायकल मार्गांनाही नागरिकांनी मोठी पसंती दाखविली आहे.