पुणे : ‘लोहगाव येथील पुणे विमानतळावरून नागरी आणि हवाई दलाच्या लष्करी विमानांच्या सुरक्षित उड्डाणांना घार आणि अन्य पक्ष्यांचा अडथळा होत आहे. विमानतळाच्या आजूबाजूला उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याकडे पक्षी, श्वान आकर्षित होत असून, विमानांचे उड्डाण, उतरण्याच्या मार्गात ते त्रासदायक अडथळा ठरत आहेत,’ असे निरीक्षण हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले. त्यामुळे विमानतळावरील धावपट्टीच्या परिसरात मानवी गस्तीसह विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘लोहगाव येथे हवाई दलाचा तळ आहे. तसेच, या विमानतळावरून नागरी विमानसेवाही मोठ्या प्रमाणात चालते. विमानतळावरून दररोज सरासरी २४० नागरी उड्डाणे होतात, तर वर्षाला सुमारे ७२ हजार उड्डाणांची नोंद होते. पुण्यात साधारणपणे २०० जातींचे पक्षी आढळतात; त्यांपैकी सुमारे २० प्रजाती विमानांच्या उड्डाण क्षेत्रात नियमितपणे दिसून येतात. या सर्व पक्ष्यांमध्ये आकाराने मोठी असलेली आणि उंचावर घिरट्या घालणारी घार सर्वाधिक त्रासदायक आहे. देशभरात २०२० ते जून २०२५ या कालावधीत ५ हजार ७४० पक्षिधडकेच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. या घटनांमध्ये ८०४ विमानांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पक्षिधडकेचा प्रश्न हा विमान सुरक्षेपुढील गंभीर आव्हान ठरत आहे.’

‘विमानतळाच्या परिसरात स्वच्छता असणे आवश्यक आहे. मात्र, उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांकडे पक्षी आकर्षित होतात. तसेच, भटके श्वानही मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात पक्ष्यांना पांगवण्यासाठी विशेष पथक, मोठा आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांचा (हाय डेसिबल झोन गन) वापर, पक्ष्यांचा अधिवास कमी करण्यासाठी धावपट्टीजवळील गवताची छाटणी, धावपट्टी आणि विमानतळ परिसरात सातत्याने गस्त घालणे अशा उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. मात्र, पक्षी, भटके श्वान, उघड्यावर फेकला जाणारा कचरा या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वायुदलाने जिल्हा प्रशासन, पुणे महापालिकेचे अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे, त्याबाबत बैठकाही झाल्या आहेत. प्रशासनाकडून त्यांच्या स्तरावर कार्यवाही केली जाते,’ असे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

‘ड्रोन’चा ताप

‘सुरक्षेच्या कारणास्तव लोहगाव विमानतळाच्या परिसरात ड्रोन उडवण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र, आता ड्रोन सहज उपलब्ध होत असल्याने विमानतळापासून प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवले जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. असे प्रकार आढळल्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली जाते. मात्र, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे,’ असे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सहा महिन्यांच्या शोधानंतर बिबट्या जेरबंद

‘काही महिन्यांपूर्वी विमानतळाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. भटके श्वान उघड्यावर टाकला जाणारा कचरा खातात. या श्वानांच्या मागे बिबट्याही विमानतळाच्या परिसरात आला. विमानतळाच्या परिसरात बिबट्या दडून राहिला होता. सुमारे सहा महिने प्रयत्न केल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले,’ अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘नागरिकांनी संवेदनशीलता दाखवणे गरजेचे’

‘देशातील अन्य शहरांप्रमाणे पुणे विमानतळाच्या अंतर्गत परिसरासह बाहेरील परिसरही प्रसन्न वाटला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनीही संवेदनशीलता दाखवून विमानतळाच्या बाहेरील परिसरात स्वच्छता राखण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी जागृतीची आवश्यकता आहे,’ असे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.