पुणे : बँकाँकहून पुणे आंतराष्ट्राीय विमानतळावर आलेल्या एका विमानाच्या प्रसाधनगृहात लपविण्यात आलेला ७४ लाख ५० हजार रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम एअर इंटेलिजन्स युनिट) पथकाने ही कारवाई केली. बँकाॅकहून पुणे आंतराष्ट्रीय उतरलेले विमान देशांतर्गत सेवेसाठी वापरण्यात येणार होते. याबाबतची माहिती अमली पदार्थ तस्करांना होती.
अमली पदार्थ तस्करांनी विमानाच्या प्रसाधनगृहातील टिश्यू कॅबिनेटचे स्क्रू काढून आतील भागातील पोकळीत पिवळ्या रंगाची पाकिटे लपविली होती. बँकाॅकहून पुण्यातील विमानतळावर मंगळवारी (३ फेब्रुवारी)विमान उतरले. कस्टमच्या पथकाला या विमानातून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कस्टमच्या पथकाने विमानाची तपासणी केली.
तेव्हा प्रसाधनगृहात लपविण्यात आलेली आठ पाकिटे जप्त करण्यात आली. या पाकिटातून ७४५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला, अशी माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.जप्त केलेल्या हायड्रोपोनिक गांजाची किंमत ७४ लाख ५० हजार रुपये असून, या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ तस्करांचा डाव
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. बऱ्याचदा परदेशातून आलेली विमाने देशांतर्गत प्रवासासाठी वापरली जातात. या तांत्रिक बाबीची माहिती घेऊन तस्करांनी विमानाच्या प्रसाधनगृहात हायड्रोपोनिक गांजा लपविला होता. आंतराष्ट्रीय प्रवासात प्रवाशांची सखोल तपासणी होती.
देशांतर्गत प्रवासात सखोल तपासणी होत नसल्याने विमाान दुसऱ्या शहरात पोहोचल्यानंतर तस्करांनी विमानात लपविलेला गांजा एखाद्या साथीदार प्रवाशाला हाताशी धरून छोट्या शहरातील विमानतळाबाहेर आणण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्यता कस्टमच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.
